सुवर्णमंदिरात घुसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना हुसकावून काढण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ या मोहिमेत सहभागी झालेले माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना येथील न्यायालयाने साडेदहा ते १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ब्रार यांच्यावर गेल्या वर्षी ३१ जुलैला लंडनमध्ये भररस्त्यावर हल्ला झाला होता.
१९८४ मध्ये सुवर्णमंदिरात झालेल्या या मोहिमेत ब्रार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेव्हापासून ते खलिस्तानवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर होते. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी ब्रार यांच्यावर चौघांनी प्राणघातक हल्ला केला. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा या हल्लेखोरांनी प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. याप्रकरणी लंडन पोलिसांनी ब्रिजेंदरसिंग संगा, दिलबाग सिंग, मनदीपसिंग संधू आणि हरजित कौर या चौघांना अटक केली होती. गेल्या वर्षी ३० सप्टेंबरला येथील कनिष्ठ न्यायालयाने चौघांनाही दोषी ठरवत कठोर शिक्षेचे आदेश दिले होते. मात्र या चौघांनीही या शिक्षेला वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले. मंगळवारी वरिष्ठ न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा योग्य ठरवत संगा आणि दिलबागला १४ वर्षांची, तर मनदीपला साडेदहा वर्षांची शिक्षा सुनावली. हरजित कौरला ११ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या चौघांनाही शिक्षेचा किमान निम्मा कालावधी तुरुंगात काढावा लागेल, त्यानंतर त्यांना पॅरोलवर सोडता येऊ शकेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ब्रार गेल्या वर्षी सुट्टीनिमित्ताने लंडनला आले होते. त्यांनी आपली बाजू मांडताना हल्ल्याचे चित्रण असलेली ध्वनिचित्रफीत न्यायालयात सादर केली, तसेच खलिस्तान्यांनी धमकावलेल्या पत्राची प्रतही सादर केली.

Story img Loader