नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील हुरियतच्या आणखी दोन गटांनी फुटीरतावादापासून फारकत घेत राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची माहिती दिली.

दोनच दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) आणि जम्मू आणि काश्मीर डेमॉक्रेटिक पोलिटिकल मुव्हमेंट (जेकेडीपीएम) यांनी फुटीरतावाद्यांशी संबंध तोडल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ तेहरिकी इस्तेक्वल आणि जे अँक के तेहेरीक-आय-इस्तीक्वामत या दोन गटांनी हुरियची साथ सोडल्याचे जाहीर केले. मोदी सरकारच्या काळात फुटीरतावाद शेवटची घटका मोजत असल्याची प्रतिक्रिया शहा यांनी समाजमाध्यमावर दिली. नव्या भारताच्या निर्मितीवर त्यांनी विश्वास दाखविल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

तेहरिकी इस्तेक्वलचे अध्यक्ष गुलाम नबी सोफी यांनी हुरियतशी संबंध तोडत असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केले. आम्ही संघर्ष केला, पण हुरियतला सामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात प्रत्येक टप्प्यावर अपयश आल्याची टीका त्यांनी केली. आम्ही सच्चे भारतीय नागरिक असून देशाच्या घटनेवर विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. तेहेरीक-आय-इस्तीक्वामतचे प्रमुख गुलाम नबी यांनीही फुटीरतावाद्यांची साथ सोडल्याचे नमूद केले.

हुरियतने सामान्यांची सहानुभूती गमावली आहे. देशविरोधी कोणत्याही कृत्यांमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

दहशतवाद्यांच्या ठिकाणावर

छापामेंढर/राजौरी: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून शस्त्रे जप्ते केली. माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या विशेष गटाने थनमंडी येथील जंगलात शोधमोहीम राबविली. त्यात शस्त्रांसह खाण्याचे पदार्थ, सौर ऊर्जा पॅनेल व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या.