आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांच्या आव्हानाचा सामना करीत ४ भारतीय विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्य़ातील आर्टेशिया आर्ट स्कूलमधील भव्य मित्र या विद्यार्थ्यांने ‘स्पेस फाऊंडेशन’ आयोजित २०१३ विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटात दुसरा क्रमांक पटकावला.
पंजाबमधील मोहाली येथे असलेल्या यादविंद्र पब्लिक स्कूल या शाळेचा विद्यार्थी असलेल्या मनकीर्त नारंग यानेही चित्रकला स्पर्धेत याच गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे. याच शाळेतील जस्मिन नारंग आणि पश्चिम बंगालमधील चतुरंग कला केंद्राच्या पायल सहा या विद्यार्थिनींनी इयत्ता ९ वी ते १२ वी या गटात अनुक्रमे चित्रकला आणि संमिश्र माध्यम या प्रकारांत पहिला क्रमांक पटकावला.
१२ विविध देशांमधून युवा कलाकार अग्रस्थानासाठी निवडले गेले. या स्पर्धासाठी ४५ देशांमधून ४७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. बालवर्ग ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा चार गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
विजेत्यांची चित्रे स्पेस फाऊंडेशनच्या २९व्या राष्ट्रीय अवकाश परिसंवादादरम्यान पुढील महिन्यामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कोलोरॅडो येथील द ब्रॉडमूर हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या विद्यार्थ्यांना लॉकहीड मार्टिन प्रदर्शन केंद्राला आणि नासाचे अंतराळवीर लेरॉय शियाओ यांना भेटण्याची दुर्मीळ संधीही मिळणार आहे. जगभरातून ३६ जणांची निवड विजेते म्हणून झाली.

Story img Loader