नवी दिल्ली : दिल्लीत ‘आप’विरोधात प्रत्येक टप्प्यावर रणनीतीमध्ये केलेला बदल, निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन, संघाची सक्रियता आणि मोदींचे नेतृत्व या प्रमुख चार घटकांमुळे भाजपला विजय मिळाल्याचे मानले जात आहे. १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त करण्याची मध्यमवर्गाला दिलेली रेवडी ‘आप’च्या सत्तेवर अखेरचा प्रहार ठरला.
भाजपने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा मद्याघोटाळा, शीशमहलवरील पैशांची उधळपट्टी, आप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून वादळ उठवले. त्यातून केजरीवालांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला. पण, निम्न आर्थिक गटातील मतदार, मुस्लीम-दलित मतदारांवर या आरोपांचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. त्यामुळे भाजपने रणनीतीमध्ये बदल केला.
महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजप सुरुवातीला अपयशी ठरला होता. मग, ‘आप’च्या मोफत योजनांना पाठिंबा देत सरकार आले तर या सर्व योजना कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. शिवाय, नव्या योजनांची खैरात केली. महिला व दलितांची मते काही प्रमाणात ‘आप’पासून तोडण्यात भाजपला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
पण, ‘आप’ची मतांची टक्केवारी कमी करण्यासाठी इतकेच पुरेसे नाही हे ओळखून भाजपने नागरी समस्यांवर भर दिला. हा बाण अचूक लागल्याचे दिसले. दिल्लीची महानगरपालिकाही ‘आप’कडे असल्याने स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहतूककोंडी, ड्रेनेज समस्या अशा मुद्द्यांवरून ‘आप’ची कोंडी केली गेली.
अस्मितेचे राजकारण
भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार न देता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पूर्वांचली, जाट, पंजाबी हिंदू, शीख, बनिया अशा विविध प्रभावशाली समूहांनी ‘आप’ला पाठिंबा दिला होता. यावेळी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून या समूहांच्या मतांमध्ये विभाजन करण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसते.
संघाची ‘दिल्ली बचाओ’ मोहीम
संघाचे कार्यकर्तेही सक्रिय झाले होते. संघाने ‘दिल्ली बचाओ’ मोहीम राबवली. उत्तम दिल्ली, उत्तम भारतासाठी दिल्लीत शत-प्रतिशत मतदान झाले पाहिजे, अशा भूमिकेतून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काही हजार बैठका घेण्यात आल्या. बुथ स्तरावर भाजपच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून घरोघरी प्रचार केला गेला. मोफत योजनांबाबत महिलांना आश्वस्त केले गेले. आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे महत्त्व पटवून देण्यावर भर दिला गेल्याचे सांगितले जाते.
छोट्या बैठकांवर भर
दिल्लीमध्ये भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली होती. केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. अखेरच्या दोन दिवसांमध्ये ‘एनडीए’च्या सर्व खासदारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा आदेश देण्यात आला होता. यमुनेच्या प्रदूषणाचा वाद रंगल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना सक्रिय केले गेले. मोहन यादव, भजनलाल शर्मा, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले. भाजपच्या नेत्यांनी छोट्या-छोट्या काही हजार बैठका घेतल्या. झोपडपट्टीतील महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले गेले.
मध्यमवर्ग मदतीला…
लोकसभा निवडणुकीमध्ये सढळ हाताने मते देणारा मध्यमवर्ग विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवायचा असेल तर मोठी रेवडी देण्याची आवश्यकता होती. मोदींनी भाषणातही मध्यमवर्गाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. अखेर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त करून दिल्लीतील मध्यमवर्ग मतदाराला खूश केले. या वर्गातील महिलांनीही भाजपला मत दिल्याचे मानले जात आहे.