उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून गेल्या चोवीस तासांत चार जणांचा बळी गेला आहे. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या थंडीमुळे तापमानात कमालीची घसरण होत असून दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राजधानी दिल्लीत १८.३ सेल्सिअस सर्वाधिक तापमान तर ७.८ डिग्री सेल्सिअस कमी तापमान नोंदले गेले आहे. काश्मीर खोऱ्यात या काळात साधारणपणे ऊन पडते. मात्र रात्रीच्या वेळी खोऱ्यातील तापमान शून्याच्या कितीतरी खाली घसरते. श्रीनगरमध्ये उणे २ डिग्री सेल्सिअस नोंदले गेले असून रविवारी उणे चार इतके नोंदले गेले होते. लेह, गुलमर्ग आदी भागांतही काश्मीरप्रमाणे बर्फाची चादर पसरली आहे. लडाखमध्ये सर्वाधिक उणे १५.४ डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेल्याची माहिती हवामान खात्याच्या प्रवक्त्याने दिली.
दरम्यान, उत्तरोत्तर थंडीचा कडाका वाढत असून झारखंडमध्ये मंगळवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या चोवीस तासांत तिघांचा थंडीने बळी घेतला असून या मोसमात आतापर्यंत २४ जण थंडीने दगावले आहेत. ललितपूर, गोरखपूर आणि मुझफ्फरनगरमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा थंडीने मृत्यू झाल्याचे सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले.      

दिल्लीतील हवाई वाहतूक सुरळीत
नवी दिल्ली :  सुमारे तीन दिवस धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या राजधानीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावरील वाहतूक बुधवारी बहुतांश नियमित होती. बुधवारी सकाळी काही काळ धुक्याचा अंमल होता. मात्र तरीही दृश्यमानता १५०० मीटर इतकी होती. त्यामुळे त्याचा हवाई वाहतुकीवर तितकासा परिणाम झाला नाही. बुधवारी काही विमाने विलंबाने हवेत झेपावली तर काही रद्द करण्यात आली, मात्र त्यामागे धुके हे कारण नव्हते, असे हवाई वाहतूक सूत्रांनी म्हटले आहे.    

Story img Loader