पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशी उत्तर भारताला झोडपून काढले. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला असून तिथे भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. बचाव आणि मदत कार्यासाठी चार राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ३९ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्तर भारतातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

हिमाचलला सर्वाधिक फटका

हिमाचल प्रदेशात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. सिमल्यामध्ये भूस्खलनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सुखिवदर सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १६ ते १७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्याचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. राज्याने गेल्या ५० वर्षांमध्ये इतका सर्वत्र मुसळधार पाऊस पाहिला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
पावसामुळे सिमला-काल्का महामार्ग बंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकटय़ा सिमला जिल्ह्यात १२० पेक्षा जास्त रस्ते बंद पडले आहेत, तर ४८४ जलपुरवठा योजनांना फटका बसला. मनालीत अडकलेल्या २० जणांची सुटका करण्यात यश आले, मात्र राज्यात विविध ठिकाणी २०० पेक्षा अधिक लोक अडकून पडले आहेत.

‘एनडीआरएफ’च्या ३९ तुकडय़ा तैनात

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा सामना करणाऱ्या पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरयाणामध्ये एनडीआरएफच्या ३९ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

यमुना धोकादायक पातळीवर

हरियाणातून सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे यमुना नदीनेही धोक्याची पातळी पार केलेली आहे. शनिवार आणि रविवारी दिल्लीमध्ये १५३ मिमी पावसाची नोंद झाली. इतक्या प्रचंड पावसाला सामोरे जाण्याची आमची तयारी नव्हती, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.

परिस्थितीवर लक्ष..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. तर मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या राज्यांना पीएम केअर निधीमधून अतिरिक्त मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली.

१३ तासांनंतर चौघांची सुटका

मध्य प्रदेशात नर्मदा नदीला पूर आला आहे. जबलपूर जिल्ह्यात भेडाघाटजवळ नदीमधील खडकावर अडकून पडलेल्या चौघांची १३ तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका करण्यात आली. हे सर्व जण मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र नदीला पूर आल्यामुळे ते तेथील खडकावर अडकून पडले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four killed in himachal landslide amy
Show comments