उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका २३ वर्षीय युवकाला हॉटेलमध्ये डांबून त्यांच्यावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर हादरलेल्या पीडित युवकाने आत्महत्या केली. चार आरोपींपैकी एकाशी सदर पीडित युवकाची सोशल मीडियावरून ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना भेटल्यानंतर हा प्रकार घडला. आरोपींनी युवकावर अत्याच करतानाचा व्हिडीओही काढला होता. या व्हिडीओची धमकी देऊन त्याकडून पैसे उकळण्याचा आरोपींचा हेतू होता. जर या प्रकाराची बाहेर कुठे वाच्यता केली तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.

सदर प्रकारानंतर शुक्रवारी (१४ जून) पीडित तरूणाने रात्री उशीरा आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी एफआयआर दाखल करत तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी पीडित युवकाच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ करवाई करत चार पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

जिम ट्रेनरशी पत्नीचे सूत जुळले, दोघांनी मिळून पतीला संपवलं; अडीच वर्षांनी पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

अटक केलेल्या आरोपींमध्ये चिलुआताल येथे राहणारा करण ऊर्फ आशुतोष (२६), देवेश राजनंद (२४) आणि अंगद कुमार (२१) यांचा समावेश आहे. तर चौथा आरोपी मोहन प्रजापती (२०) हा अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपींनी पीडित युवकाचे अपहरण करून त्याला चिलुआताल परिसरातील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते. तिथे त्याला पट्ट्याने मारहाण करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, पीडित मुलगा त्याच्या भावासह भाड्याच्या घरात राहत होता. याठिकाणी राहून तो स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. महिन्याभरापूर्वी आरोपी करण याच्याशी त्याची सोशल मीडियावरून मैत्री झाली होती. गेले काही दिवस ते एकमेकांशी बोलत होते. दरम्यान करणने त्याला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. गुरुवारी करणने पीडित युवकाला चिलुआताल परिसरातील रेल विहार हॉटेलमध्ये बोलावले. तिथेच इतर तीन आरोपीही नंतर आले.

“हिंदुजांनी नोकरांपेक्षा कुत्र्यावर जास्त खर्च केला”, घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोप; म्हणाले, “१८ तास काम करून फक्त..”

पोलीस अधिक्षक जितेंद्र कुमार श्रीवास्तव म्हणाले की, आरोपींनी पीडित युवकावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने यास विरोध केला. तेव्हा त्याला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. याबरोबरच त्यांनी याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले. या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्यांनी दिली. तसेच या बदल्यात पैशांचीही मागणी केली. पीडित युवकाच्या मोबाइलमधून युपीआयद्वारे व्यवहार करून आरोपींनी बिअरही विकत घेतली होती.

या घटनेनंतर पीडित युवकाने शाहपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यक्षेत्राची अडचण असल्यामुळे त्याला चिलुआताल याठिकाणी तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. शुक्रवारी युवकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार), कलम ३८४ (खंडणी उकळणे), कलम ५०६ (गुन्हेगारी कार्यवाही) अनुसार गुन्हा दाखल केला. एफआयआर दाखल झाल्यानंतर रात्री १ वाजता पीडित युवकाने आपल्या भावाशी फोनवर संवाद साधला होता आणि रात्री अचानक त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.