काश्मीर खोऱ्यात कुपवाडा आणि अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
अनंतनागमधील सिलीगाव येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराची नाकाबंदी केली होती. त्यावेळी गोळीबार करणाऱ्या तिघा अतिरेक्यांना जवानांनी ठार केले. कुपवाडातील जंगलात एका अतिरेक्याला ठार करण्यात आले. चारही अतिरेक्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू
आहे.
याच ठिकाणी मागील आठवडय़ात कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले होते. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला अतिरेक्यांचा मोठा गट या परिसरात दाखल झाल्याचे समजल्यानंतर सुरक्षा दलांनी १३ नोव्हेंबरपासून शोधमोहीम सुरू केली आहे. अशाच मोहिमेवर असताना १७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय रायफल्सच्या कर्नल महाडिक यांनी हौतात्म्य पत्करले.

राजौरीत चकमकीत जवान हुतात्मा
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. संरक्षण प्रवक्तयाने सांगितले, की आज सकाळी लष्कराच्या गस्ती पथकावर प्रत्यक्ष ताबा रेषेवर नौशेरा येथे अतिरेक्यांनी गोळीबार केला. भारतीय जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले असून या चकमकीत एक जवान जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्याचे निधन झाले. शिपाई सुदीमेश असे हुतात्मा जवानाचे नाव आहे.