गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी तेलंगणाहून गडचिरोलीत आलेले चार नक्षलवादी मंगळवारी पहाटे विशेष नक्षलविरोधी पथक ‘सी ६०’च्या जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. अहेरी तालुक्यातील कोलामार्का जंगल परिसरात ही चकमक झाली.
तेलंगणातील मंगी इंद्रावेल्ली- कुमरामभीम येथील नक्षलवाद्यांचा विभागीय सचिव सदस्य व्हर्गिस (२८, बिजापूर), सिरपूर-चेन्नूर क्षेत्र समितीचा सचिव मंगलू (३२, कोटराम-बिजापूर), सदस्य कुरसंग राजू आणि कुडीमेट्टा व्यंकटेश अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. या चौघांवर ३६ लाखांचे बक्षीस होते.
हेही वाचा >>>VIDEO : बाबो! बिअरच्या बाटलीसाठी जादा पैसे घेतल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; झाडावर चढला अन्…
पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी रात्री नक्षलवाद्यांच्या तेलंगणा समितीच्या काही सदस्यांनी प्राणहिता नदी ओलांडून अहेरी तालुक्यात प्रवेश केला. गडचिरोली पोलिसांना कुणकुण लागताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष नक्षलविरोधी पथक ‘सी ६०’च्या जवानांना कोलामार्का जंगल परिसरात कारवाईची सूचना केली.
मंगळवारी पहाटे ४ वाजता नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. ‘सी ६०’ पथकानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. चकमक थांबल्यानंतर परिसराची झडती घेतली असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके ४७, एक कार्बाइन आणि दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले. चार वरिष्ठ सदस्य ठार झाल्याने नक्षलवादी चळवळीला हादरा बसला आहे.
या पत्रकार परिषदेला नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, यतिश देशमुख आणि अधिकारी उपस्थित होते.