छत्तीगढच्या कांकेर भागात राबवण्यात आलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कर आणि पोलिसांना यश आले आहे. रविवारी ही मोहिम राबवण्यात आली. चार मृतदेहांपैकी जयसिंग कुंजमवर या नक्षलवाद्याच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तर इतर तीन मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. जयसिंग कुंजमवर पाच लाख रूपयांचे बक्षीस लावण्यात आले होते अशी माहितीही समोर आली आहे. ज्या ठिकाणी ही कारवाई झाली तिथून सैन्यदलाने, ३१५ बोअर बनावटीच्या तीन रायफल्सही जप्त केल्या आहेत.

पोलीस दलाच्या २ आणि सैन्यदलाच्या १० तुकड्या या कारवाईत सहभागी झाल्या होत्या. नक्षलवादी कांकेरच्या जंगलात लपले आहेत, अशी माहिती मिळाल्यानेच ही मोहिम आखण्यात आली होती. वाढत्या नक्षली कारवायांना लगाम घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. वाढत्या नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि लष्कराकडून छत्तीसगढच्या विविध भागांमध्ये ही अशा मोहिमा सुरुच आहेत.

रविवारीच झालेल्या आणखी एका मोहिमेत नक्षलवादी मोहला एरिया समितीची सचिव समिला पोटईसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. समिला आणि इतर दोन महिला नक्षलवाद्यांवर ९ लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. ही कारवाईदेखील पोलीस आणि सैन्यदलाने केली आहे. पेंदोडीच्या जंगलात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एएनआयने दिली आहे. तसेच या ठिकाणाहूनही मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

 

Story img Loader