पीटीआय, जिनिव्हा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय वंशाचे अब्जाधीश प्रकाश हिंदुजा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना स्वित्झर्लंडमधील फौजदारी न्यायालयाने शुक्रवारी चार ते साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. गृहसेवकांचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

प्रकाश हिंदुजा यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांच्यावर त्यांच्या गृहसेवकांची तस्करी केल्याचा आरोप होता. मात्र न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले. पण गृहसेवकांचा छळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. जिनिव्हामधील हिंदुजा कुटुंबातील आलिशान बंगल्यामध्ये बहुतेक निरक्षर असलेल्या काही भारतीय नागरिकांना गृहसेवकाचे काम देण्यात आले होते. या गृहसेवकांचा छळ केल्याचा आणि त्यांना अनधिकृत रोजगार देण्याच्या आरोपाप्रकरणी हिंदुजा कुटुंबातील चौघांना दोषी ठरवण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. गृहसेवकांचे पारपत्र जप्त करणे, त्यांना स्विस फ्रँकऐवजी भारतीय रुपयांत वेतन देणे, बंगल्याबाहेर जाण्यास त्यांना मज्जाव करणे आणि कमी वेतन देऊन त्यांना अधिक वेळ काम करण्यास राबवणे आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले.

पाळीव श्वानावर अधिक खर्च

या प्रकरणातील सरकारी वकील यवेस बर्टोसा यांनी न्यायालयाला सांगितले की, हिंदुजा कुटुंब त्यांच्या पाळीव श्वानापेक्षाही कमी खर्च त्यांच्या गृहसेवकांवरील वेतनात करत होते. गृहसेवकांकडून १८ तास काम करून घेतले जात होते आणि त्यांना केवळ सात स्विस फ्रँक (६५४ रुपये) वेतन दिले जात होते. या अब्जाधीश कुटुंबाकडून आपल्या पाळीव श्वानावर वर्षाला ८,५८४ फ्रँक (जवळपास ८ लाख रुपये) खर्च केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four of hinduja family sentenced to imprisonment alleged harassment of domestic servants amy