इम्फाळ :मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तीन ग्रामीण स्वयंसेवक ठार तर पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रविवारी रात्री उशिरा खोइजुमंताबी गावात घडली. हे स्वयंसेवक एका तात्पुरत्या खोदलेल्या चरात बसून परिसराचे रक्षण करत होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय चुराचांदपूरमध्ये एका व्यक्तीचे शीर कापून हत्या झाली, असे पोलिसांनी सांगितले.
विष्णुपूरमघ्ये अनेक तास चाललेल्या या चकमकीत पाच स्वयंसेवक जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. इम्फाळमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एन. बीरने सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, कांगपोक्पी येथे अडविण्यात आलेला महामार्ग क्र. २ खुला केला जात असल्याचे कुकी बंडखोरांनी रविवारी जाहीर केले.
इम्फाळमध्ये निर्बंध शिथिल
हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे निर्बंध रविवारी शिथिल करण्यात आले.
राज्यात वांशिक संघर्ष उफाळल्यानंतर ३ मे रोजी लोकांच्या हालचालींवर निर्बंध लावण्यात आले होते.