अमेरिकेत टेक्सासमध्ये गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच ओक्लाहोमा येथे एका वैद्यकीय इमारतीत गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरदेखील ठार झाला असून पोलीस त्याची ओळख पटवत आहेत.

सीएनएनच्या वृत्तानुसार, तुलसा पोलिसांना बुधवारी सकाळी सेंट फ्रान्सिस रुग्णालय परिसरातील वैद्यकीय इमारतीत एक व्यक्ती शस्त्र घेऊन पोहोचला असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत हल्लेखोराने गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडली.

हल्लेखोराकडे एक रायफल आणि हँडगन होती. या गोळीबारामागील कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस सध्या हल्लेखोराची ओळख पटवत आहेत. हल्लेखोर ३५ ते ४० वयोगटातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे.

Story img Loader