केंद्र सरकारने बुधवारी पंजाब, मणिपूर, आसाम, अंदमान आणि निकोबर या चार राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांची मणिपूर, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसाम, माजी खासदार व्ही. पी. सिंह बडनोर यांची पंजाबच्या तर दिल्लीचे माजी आमदार प्रो. जगदीश मुखी यांची अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले.
७५ पेक्षा जास्त वय असलेल्या मंत्र्यांनी पदावर राहण्यापेक्षा मंत्रिमंडळाला आणि पक्षाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ७६ वर्षीय नजमा हेपतुल्ला यांनी गत महिन्यातच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पूर्वीच्या काँग्रेसच्या सदस्य राहिलेल्या हेपतुल्लाह या १९८० पासून राज्यसभेच्या सदस्य आहेत. २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. १९८५-८६ तसेच १९८८ ते २००७ पर्यंत त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या. यापूर्वी मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांच्याकडे मणिपूर राज्याचा अतिरिक्त पदभार होता.
नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांच्याकडे आसामचा पदभार होता. तिथे आता पुरोहित यांची निवड झाली आहे. नागपूरमधील दैनिक हितवादचे व्यवस्थापकीय संपादक असलेले पुरोहित हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. हरयानाचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडे पंजाबचा अतिरक्त पदभार होता. शिवराज पाटील हे मागच्या वर्षी पंजाबच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाले होते. तेव्हापासून कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडे पदभार होता. आता राज्यस्थानचे बडनोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढीलवर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल (निवृत्त) ए. के. सिंग यांची जागा दिल्लीचे प्रो. जगदीश मुखी हे घेतील.