मागील काही दिवसांपासून कोलकाता शहरात महिला मॉडेलच्या मृत्यूचं सत्र सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोलकात्यात ३ मॉडेल्स आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. रविवारी सकाळी एक १८ वर्षीय मॉडेल आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
सरस्वती दास असं मृत आढळलेल्या १८ वर्षीय मॉडेलचं नाव आहे. ती मेकअप आर्टिस्ट देखील होती. रविवारी सकाळी कसबा परिसरातील बेदियाडंगा येथील आपल्या राहत्या घरात ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सरस्वतीने काही छोट्या उपक्रमांसाठी मॉडेलिंग केलं होतं. तिला अनेक ऑफर देखील मिळाल्या होत्या. शनिवारी रात्री तिने आपल्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला असावा, अशी प्राथमिक माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.
प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसत आहे. पण अन्य बाजूंनी देखील तपास होणं आवश्यक आहे. सरस्वतीच्या आजीने तिला सर्वप्रथम लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर तिने तातडीने चाकुने फास कापला आणि नातीला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. कोलकाता शहरात मृत आढळलेल्या इतर तीन मॉडेलशी सरस्वतीचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी सरस्वतीचा मोबाइल ताब्यात घेतला असून त्याचा बारकाईने तपास केला जात आहे.
गेल्या आठवड्यात बुधवारी बिदिशा मुजुमदार हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी बिदिशाची २६ वर्षीय मैत्रीण आणि मॉडेल मंजुषा आपल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. बिदिशाच्या मृत्यूमुळे ती अस्वस्थ होती, अशी माहिती मंजुषाच्या आईनं पोलिसांना दिली होती. तर पल्लवी डे नावाची अन्य एक मॉडेल १५ मे रोजी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.