टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्का बसत आहेत. सोमवारी तीन भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून अंकारा प्रांतातील मध्य गोलबासी शहरात हा भूकंप झाला आहे.
तत्पूर्वी सोमवारी टर्कीमध्ये ७.८ रिश्टर स्केल, ७.६ रिश्टर स्केल आणि ६.० रिश्टर स्केल असे तीन मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे टर्की आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत ४ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजार नागरीक जखमी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ हजार ०२२ जणांचा शोध घेण्यात आला असून ७ हजार ८४० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच तीन लाखांपेक्षा जास्त भूकंपग्रस्तांना वसतिगृहे आणि विद्यापीठांमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – सीरियाच्या युद्धभूमीत नैसर्गिक आघाताने महाविध्वंस
भारताकडूनही मदत
दरम्यान, भूकंपामुळे टर्कीमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. भारतही टर्कीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) टीम टर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी रात्री या टीम टर्कीसाठी रवाना झाल्या आहेत.