सूर्यापासून निघालेल्या अतिनील किरणांना पृथ्वीतलापर्यंत पोहोचू न देण्यात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वातावरणातील ओझोन थराची पातळी येत्या काही दशकांत पूर्ववत होईल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांच्या नव्या पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वातानुकूलन प्रक्रियेतील अर्थात रेफ्रिजरेटरमधून बाहेर पडणारा ओझोनविरोधी वायू कमी झाला आहे. तसेच वायुप्रदूषणात घट झाल्याने ओझोनचा थर पूर्वस्थितीत येत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रम आणि जागतिक हवामान संघटनांनी केलेल्या अभ्यास आणि संशोधनातून ही माहिती देण्यात आली आहे. पृथ्वीच्या वातावरणातील स्थितांबर ओझोन थर हा सौम्य वायुकवचाने बनलेला असतो. हे कवच सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करते.गेल्या काही वर्षांपासून ओझोनच्या थराला बाधा येईल, अशा कोणत्याही वायूंचा वापर रोखण्यासाठी केलेले करार आणि ओझोन कार्यक्रमांचे फलित म्हणून येत्या २०५० पर्यंत थरामध्ये दहापट वाढ होण्याची शक्यता आहे, यंदा घेतलेल्या विशेष आढाव्यात स्पष्ट केले आहे. ‘मॉन्ट्रेअल करारा’ची यात महत्त्वाची जबाबदारी राहिली आहे. यानुसार येत्या काळात त्याची सकारात्मक बाजू सर्वाना दिसेलच, पण काही घातक वायूंपासून होणारा त्वचेचा कर्करोग, डोळ्यांना होणारी इजा, याशिवाय प्राण्यांचे रक्षण आणि निरोगी शेतीमाल वाढण्यास मदत होईल, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रीनहाऊसमधून बाहेर येणाऱ्या वायूंचा यावरील परिणाम मोठय़ा प्रमाणावर घातक ठरला आहे. त्यांच्या वापरावरही आता मर्यादा आल्याने येत्या काळात पोषक वातावरण तयार होईल. शतकाच्या मध्यावधीस ओझोन थरातील प्रगती अपेक्षित पातळीच्या वर असेल.
घट नाही, वाढीच्या दिशेने पाऊल
मॉन्ट्रेअल करारानुसार वातावरणातील घातक वायू, तसेच ओझोन थराला बाधा आणणाऱ्या ‘सीएफसी’ (क्लोरोफ्लोरोकार्बन्स) व हॅलोन यांसारख्या वायूंचे उत्सर्जन शक्य तितक्या वेगाने कमी करणे आणि त्याऐवजी पर्यावरणपूरक अशा साधनांचा वापर करण्यावर मोठा भर देण्यात आला होता. फ्रिज, स्प्रे कॅनमधील या वायूंचा वापर बंद करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करणे या महत्त्वपूर्ण निर्णयांचा करारात समावेश होता. १९८० ते ९० या दरम्यान, ओझोनच्या थरात मोठय़ा प्रमाणावर घट झाली होती. मात्र २००० पासून ओझोनच्या घटप्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. या क्षणी तर ओझोनची भविष्यातील स्थिती ही वाढीच्या दिशेने असेल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ओझोन थर मजबूत होत गेल्यास कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या अतिनील किरणांना रोखता येईल, असे मत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा