एपी, पॅरिस
फ्रान्समध्ये सोमवारपासून दोन दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद सुरू होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्यासह अध्यक्षपद भूषणवणार आहेत. तसेच या दौऱ्यात ते भारत-फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) गटाशी संवादही साधणार आहेत.
या परिषदेला जागतिक नेते, महत्त्वाच्या कंपन्यांचे अधिकारी आणि तज्ज्ञ हजेरी लावणार असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे भू-राजकीय परिणाम यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीनंतर लगेचच ‘एआय’साठी ५०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची ‘एआय’संबंधी महत्त्वाकांक्षा, चीनने बाजारात आणलेले डीपसीक याचा या परिषदेवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या परिषदेला जगभरात अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स हे या परिषदेला हजर राहणार असून चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग त्यांचा विशेष दूत पाठवणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्येकाला लाभ करून घेताना त्याचे अपरिमित धोके थांबवण्याच्या दृष्टीने त्याचा कसा वापर करून घेता येईल यावर दोन दिवस विचारमंथन केले जाईल.