फ्रान्समध्ये दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे जवळपास सर्व निकाल हाती आले आहेत. यानुसार, फ्रान्समध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाला मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कमी जागा मिळाल्या आहेत. त्याचसोबत उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅलीलाही बहुमत मिळवता आलेलं नाही. तसेच, सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या डाव्या पक्षांनाही बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे फ्रान्समध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहेत फ्रान्स निवडणूक निकाल?

फ्रान्समध्ये २४ जून व ७ जुलै अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी एन्सेम्बल पक्षाला अवघ्या १४८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यापाठोपाठ कट्टर उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाला १४२ जागा मिळाल्या आहेत. तर छोट्या छोट्या गटांमध्ये विभागले गेलेले समाजवादी, साम्यवादी आणि कट्टर डावे फ्रान्स अनबोड या गटांनी फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्यानंतर एकत्र येत स्थापन केलेल्या न्यू पॉप्युलर फ्रंटला सर्वाधिक १७७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एकूण ५७७ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात कोणत्याही पक्षाला बहुमताचा २८९ जागांचा आकडा गाठता आलेला नाही.

पंतप्रधान एका तर राष्ट्राध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा! फ्रान्समध्ये ‘कोहॅबिटेशन’ची अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल?

आता फ्रान्समध्ये काय होणार?

फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार कोणत्याच बाजूला बहुमत न मिळाल्यास सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकार स्थापना आणि पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी पाचारण करतात. पण त्यासाठी आवश्यक सदस्यसंख्या डाव्या गटांची नॅशनल पॉप्युलर फ्रंट पूर्ण करू शकेल का? हा चर्चेचा विषय ठरला आहे. असं झाल्यास फ्रान्समध्ये कोहॅबिटेशनची स्थिती निर्माण होईल. या स्थितीमध्ये राष्ट्राध्यक्ष एका पक्षाचे, तर पंतप्रधान दुसऱ्या पक्षाचे अशी व्यवस्था फ्रान्समध्ये अस्तित्वात येईल.

पंतप्रधान राजीनामा देणार

दरम्यान, फ्रान्सचे विद्यमान पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पक्षाचे नेते गॅब्रिएल अटल यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. “मी राजीनामा देणार आहे. पण जोपर्यंत आवश्यकता असेल, तोपर्यंत या पदाची जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे. फ्रान्समध्ये लवकरच जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात न भूतो, न भविष्यती अशी स्थिती निर्माण झाली आहे”, अशी प्रतिक्रिया अटल यांनी दिली आहे.

फ्रान्सच्या राजकारणाला ‘उजवीकडे’ घेऊन जाणाऱ्या मारीन ल पेन कोण? अध्यक्ष माक्राँ यांनाही डोकेदुखी ठरणार?

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका काय?

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सत्ताधारी एन्सेम्बल पक्षाला फक्त १४८ जागा जिंकता आल्या. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा पंतप्रधान पदावर बसणार नाही हे निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमवीर “राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून आहेत. फ्रान्सच्या जनतेनं दिलेल्या सार्वभौम कलाचा आदर ठेवला जाईल याची खातरजमा राष्ट्राध्यक्षांकडून केली जाईल”, असं निवेदन मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: France general election results hung parliament in national assembly left parties won most seats pmw
Show comments