जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन म्हणजे गुगल! मात्र याच गुगलला फ्रान्समध्ये तब्बल दीड लाख युरो म्हणजेच दोन लाख पाच हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. लोकांची खासगी माहिती उघड करणे गुन्हा आहे. मात्र गुगलने या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गुगलला यापूर्वीही अनेक देशांमध्ये खासगी माहिती उघड केल्याने कारवाईला सामोरे जावे लागले आहे. चीन, ब्राझील यांसह अनेक देशांमध्ये गेल्या वर्षी गुगलला १५०० डॉलपर्यंत दंड झाला आहे.
सीएनआयएल या सरकारी संस्थेतर्फे फ्रान्समध्ये माहितीचे जतन व संरक्षण करण्यात येते. याच संस्थेतर्फे गुगलला दंड करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये व्यक्तिगत माहितीच्या संरक्षणाबाबत नवा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याची माहिती २०१२मध्येच गुगलला देण्यात आली होती. गुगलने त्यांचे सर्च इंजिन, जी-मेल किंवा यू-टय़ूबवरील एखाद्याची खासगी माहिती प्रसिद्ध करू शकत नाही. कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी जाहिरातींद्वारे कुणालाही व्यक्तिगत लक्ष्य करण्याचा गुगलला अधिकार नाही, असे बजावण्यात आले असतानाही अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फ्रान्समधील गुगल वापरकर्त्यांची माहिती, व्यक्तिगत माहिती साठवण्याची प्रक्रिया आणि किती काळापर्यंत ते माहिती साठवू शकतात याची माहिती देण्याची सूचना सीएनआयएलने गुगलकडे केली होती. मात्र ते देण्यास गुगल असमर्थ ठरले. त्यामुळे गुगलवर कारवाई करण्याचा निर्णय सीएनआयएलने घेतला. गुगलने यासंदर्भात काय निर्णय घेतला आहे, तो येत्या आठ दिवसांत त्यांच्या फ्रेंच होमपेजवर प्रसिद्ध करावा आणि ४८ तास तो होमपेजवर असू द्यावा, असे आदेशही सीएनआयएलकडून देण्यात आले आहेत.