फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. मॅक्रॉन सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. सात दिवस ते सेल्फ आयसोलेशनमध्येच राहणार आङेत. गुरुवारी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. सध्या त्याच्यामध्ये प्राथमिक लक्षणं दिसून येत असून ते आयसोलेशनमध्ये असतानाही काम सुरु ठेवणार आहेत, असं राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार मॅक्रॉन यांना करोनाची प्राथमिक लक्षणं सौम्य प्रमाणात दिसून आल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल हाती आल्यानंतर मॅक्रॉन यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं. फ्रान्समधील नियमांनुसार करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता मॅक्रॉन सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. या कालावधीमध्ये ते आपलं काम सुरु ठेवणार आहेत. या कालावधीमध्ये व्हिडीओ कॉलवरुन होणाऱ्या सर्व बैठकांना आणि चर्चा सत्रांनाही मॅक्रॉन उपस्थिती लावणार आहेत. मॅक्रॉन यांच्या संपर्कात आलेले देशाचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांच्या करोना चाचणीचा निकाल नकारात्मक आला आहे.

आतापर्यंत १६ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू

जगभरातील करोना रुग्णांची संख्या ७ कोटी ४८ लाखांपर्यंत पोहचली आहेत. त्यापैकी ५ कोटी २६ लाख रुग्ण या आजारामधून बरे झाले आहेत. तर जगभरात या आजारामुळे १६ लाख ६० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. करोनाचा संसर्ग झालेले मॅक्रॉन हे जगातील पहिले मोठे नेते नसून यापूर्वीही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही करोनाची लागण झाली होती. ट्रम्प यांना काही दिवस रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आलं होतं.

लसीआधीच जर्मनीमध्ये परिस्थिती पुन्हा चिंताजनक

जर्मन सरकार आणि येथील आरोग्यव्यवस्थेवर देखरेख ठेवणारी मुख्य संस्था २७ डिसेंबरला करोनाच्या लशीला परवानगी देण्याची शक्यात आहे. जर्मनीमध्ये सर्वात आधी आश्रमांमध्ये राहणाऱ्या वयस्कर व्यक्तींना लस दिली जाणार आहे. वयोवृद्ध लोकांनंतर इतरांना ही लस दिली जाणार आहे. जर्मन बायोएनटेक आणि फाइजरच्या लसीचा जर्मनीमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मात्र लसीकरणाला सुरुवात होण्याआधी जर्मनीमधील परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच जर्मनीने सर्व दुकाने, शाळा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीमध्ये मागील ११ दिवसांमध्ये सरासरी ४०० जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे.

इटली आणि स्पेनमध्येही चिंता वाढली

करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जर्मनीमध्ये बुधवारपासून लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जर्मनीमध्ये आतापर्यंत २३ हजार ४२७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर जर्मनीत काही प्रमाणात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात आलेत. जर्मनीबरोबरच इटली आणि स्पेनमध्येही करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागलाय.

नेदरलँड्समध्येही १९ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन

नेदरलँड्समध्येही पाच आठवड्यांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय. पंतप्रधान मार्क रुट यांनी यासंदर्भातील घोषणा केली असून सध्या तरी करोनावर परिणामकारक उपाय दिसत नसल्याने लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. पुढील पाच आठवडे नेदरलँड्समधील दुकाने, शाळा, व्यायामशाळा आणि अनेक सार्वजनिक ठिकाणं बंद राहणार आहेत. १९ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची सूट मिळण्याची अपेक्षा ठेऊ नये असंही सराकरकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भविष्यामध्ये परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाऊ नये अशी आमची इच्छा असल्याने आम्हाला हे कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. कोणाच्याही घरी पुढील काही काळासाठी जास्तीत जास्त दोन पाहुण्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या पाहुण्यांबद्दलही स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना आधीच माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नेदरलँड्स सरकार २४ ते २५ डिसेंबर म्हणजेच नाताळाच्या काळात काही सूट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सौदी अरेबियाने लसीकरण सुरु केलं

सौदी अरेबियाने गुरुवारपासून लसीकरणाला सुरुवात केली आहे. पहिली लस देशाचे आरोग्य मंत्री डॉ. तौफीक अळ रबिह यांना देण्यात आली. सौदीच्या आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये गुरुवारपासून लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सौदीमध्ये आतापर्यंत करोनाचे तीन लाख ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. तर देशातील सहा हजारहून अधिक जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. हे लसीकरण म्हणजे एका मोठ्या संकटाला संपवण्याची सुरुवात आहे, असं मत लस घेतल्यानंतर डॉ. तौफीक यांनी व्यक्त केलं. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, बहरीन, रशिया या देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झालीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: France president emmanuel macron covid positive situation in european countries in alarming scsg
Show comments