फ्रान्सच्या पॅरिसमध्ये निवृत्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी ९० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती फ्रान्सचे मंत्री जेराल्ड डर्मेनिन यांनी दिली.

हेही वाचा – समान नागरी कायदा, ‘एनआरसी’चे भाजपचे आश्वासन; कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा

मीडिया रिपोर्टनुसार , फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निवृत्ती कायद्यात बदल केले आहेत. नव्या कायद्यानुसार निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ वर्ष करण्याचा निर्णय इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने घेतला आहे. मात्र, निर्णयाला कामगारांकडून विरोध करण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी कामगार दिनाच्या निमित्ताने पॅरिसमधील स्थानिक कामगारांकडून या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी एक लाखाच्यावर कामगार रस्त्यावर उतरले होते. मात्र, या आंदोलनाला चांगलंच गालबोट लागलं. यावेळी कामगारांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करून कामगारांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – थेट घटस्फोट देण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार; घटनेतील अनुच्छेद १४२(१)च्या वापरावर घटनापीठाचे शिक्कामोर्तब

या घटनेत १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले असून याप्रकरणी ९० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती फ्रान्सचे मंत्री जेराल्ड डर्मेनिन यांनी दिली. तसेच यासंदर्भात फ्रान्सचे पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनीही प्रतिक्रिया दिली. देशात अशा प्रकाचा हिंसाचार मान्य नसल्याचे ते म्हणाले.