काँग्रेसकडून चौकशीची मागणी; सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही घोटाळा केल्याचा दावा

भाजपचे अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर काँग्रेसने सोमवारी हवाला गैरव्यवहाराचा आरोप केला. हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपांची नि:ष्पक्षपणे चौकशी करावी, असे  आव्हानही काँग्रेसने दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहा यांच्यासह महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. ‘पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या वैद्य्नाथ सहकारी बँकेकडे रद्दबातल केलेल्या चलनातील दहा कोटींच्या नोटा सापडल्या. जर ते पैसे बँकेचे असतील तर खासगी गाडीमध्ये कसे सापडले? ती गाडी कुणाची होती? दहा कोटी घेऊन जाणारे ते कोण लोक होते? आणि ते कोणाकडे घेऊन निघाले होते? असाच प्रकार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेशी संबंधित घडला. त्यांच्या गाडीतून नव्वद लाख रूपये सापडले होते. हा तर सरळसरळ हवाला गैरव्यवहार आहे. काळ्याचे पांढरे करण्याचा प्रकार आहे,’ असे रमेश म्हणाले.

‘वैद्यनाथ’च्या अकरा शाखांवर सीबीआयने नुकतेच छापे मारले आहेत. दोन व्यवस्थापकांसह पद्म्श्रीप्राप्त डॉक्टर सुरेश अडवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर केवळ दोन दिवसांत पाचशे कोटी रूपयांची रक्कम जमा झाल्याबद्दल रमेश यांनी शंका व्यक्त केली. या सगळ्या प्रकारात शहा यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

गुजरातमधील उद्योजक महेश शहा आणि भाजप नेत्यांमधील संबंधांच्या चौकशीचीही रमेश यांनी मागणी केली. बेहिशेबी उत्पन्न घोषित करण्याच्या योजनेमध्ये (आयडीएस) महेश शहांनी अगोदर १३,८६० कोटी रूपयांची घोषणा केली; पण नंतर रक्कम भरण्यास असमर्थता व्यक्त केली होती. ‘महेश शहांचे पंतप्रधान मोदी व अमित शहांबरोबर असलेल्या संबंधांची चौकशी करणार का, असा सवालही त्यांनी केला.