Fraud News : हैदराबादमध्ये एका ६० वर्षीय महिलेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित महिलेच्या भावाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने तिच्या भावासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका कॉफी पावडर बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

एका ६० वर्षीय महिला व्यावसायिकाने तिच्या भावासह सहा जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत बनावट कॉफी पावडर बनवणाऱ्या कंपनीत २.८ कोटी रुपयांची गुंतवणूक करून फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. वृत्तानुसार, ५.७ कोटी रुपयांची गुंतवणूक योजना असल्याचं सांगून या योजनेच्या माध्यमातून जास्त परतावा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

२०१९ मध्ये या व्यावसायिक महिलेशी तिच्या भावाने आणि त्याच्या पत्नीने संपर्क साधला. ज्यांनी तिला गुंतवणुकीवर मासिक ४ टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच त्यांनी सांगितलं की हे पैसे केनियातील एका कॉफी पावडर उत्पादन कंपनीला निधी देण्यासाठी वापरले जाणार आहेत. ही कंपनी अमेरिकेत नवीन युनिट सुरु करत आहे, असं सांगून संबंधित महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी तक्रारदार महिलेला वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ख्रिस गेलचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. तसेच तो देखील या व्यवसायात प्रवर्तक म्हणून सहभागी असल्याचं सांगून विश्वास संपादन केला.

दरम्यान, आरोपींनी तक्रारदार महिलेला सांगितलं होतं की संबंधित कॉफी पावडर कंपनीचा मालक आपल्याला ओळखतो. त्यानतर तक्रारदार महिलेने तिच्या भावावर विश्वास ठेवला आणि २.८ कोटी गुंतवले. त्यानंतर तिने कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना आणखी २.२ कोटी गुंतवण्यास प्रोत्साहित केले. इतरांनी ७० लाख म्हणजे एकूण ५.७ कोटी गुंतवले. सुरुवातीला आरोपीने परतावा दिला आणि गुंतवणूकदारांना व्यवसाय कायदेशीर असल्याचं पटवून दिलं.

पण काही कालावधीनंतर पैसे परतावा देणं बंद झालं. त्यानंतर तक्रारदार महिलेने तिच्या भावाला विचारलं असता तेव्हा टाळाटाळ सुरु केली. यानंतर महिलेने आरोपीला पुन्हा पैशाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला शिवीगाळ केली. यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.दरम्यान, ज्यांनी ५.७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांना फक्त ९० लाख रुपयांचा परतावा देण्यात आला होता, असं वृत्तात म्हटलं आहे.

Story img Loader