केंद्राच्या नव्या धोरणानुसार १८ ते ४४ वयोगटाला लस
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे नवे लसीकरण धोरण आज, सोमवारपासून अमलात येत आहे. या धोरणानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल. मात्र, राज्यात प्राधान्याने ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे केंद्राचे धोरण मनमानी पद्धतीचे आणि तर्कशून्य असल्याचे भाष्य केले होते. त्यानंतर काही दिवसांनी केंद्राने नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज, २१ जूनपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला केली होती.
नव्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकार लसउत्पादकांकडून उपलब्ध लसमात्रांपैकी ७५ टक्के मात्रा खरेदी करून त्यांचा राज्यांना पुरवठा करणार आहे. लसीकरणासाठी राज्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
सोमवारपासून सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल. अर्थात काही राज्यांनी आधीच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू केले आहे.
केंद्र सरकार लशींच्या मात्रा खरेदी करून त्या राज्यांना मोफत पुरवणार असले तरी त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. लोकसंख्या, संसर्गाचे प्रमाण आणि लसीकरणातील प्रगती या निकषांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लशींच्या मात्रांचा पुरवठा करण्यात येईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
खासगी रुग्णालयांना उपलब्ध लशींपैकी लसउत्पादकांकडून थेट २५ टक्के लसमात्रा खरेदी करता येतील. खासगी रुग्णालयांना लशीच्या मूळ किमती व्यतिरिक्त प्रतिमात्रा १५० रुपयांहून अधिक सेवाशुल्क घेता येणार नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. खासगी रुग्णालयांतील लसीकरणावर देखरेख ठेवणे ही राज्यांची जबाबदारी असेल.
सर्व सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रे थेट केंद्रांवरच नोंदणी सुविधा उपलब्ध करतील. ही सुविधा व्यक्ती आणि समूहांसाठीही उपलब्ध असेल. त्यासाठी सविस्तर कार्यपद्धती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रसिद्ध करतील, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. लसीकरणाची तारीख आणि वेळ घेण्यासाठी राज्ये सामाईक सेवा केंद्रे आणि कॉल सेंटरचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतील, असेही केंद्राने म्हटले आहे.
राज्यात ९,३६१ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात दिवसभरात ९,३६१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १९० जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ९,१०१ रुग्ण करोनामुक्त झाले.
राज्याच्या बहुतेक जिल्ह्य़ांत निर्बंध कायम
मुंबई : रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने राज्यातील २५ जिल्हे निर्बंधमुक्त होऊ शकले असते, पण संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती, गर्दी टाळण्यासाठी केंद्राने दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याचे टाळण्यात आले आहे. महिनाअखेपर्यंत निर्बंध कायम ठेवले जातील, असे संके तच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी दिले. त्यामुळे लोकल प्रवासासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
मुंबई, ठाण्यात केंद्रे सज्ज
’मुंबईतील २४९ केंद्रांवर आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांबरोबरच ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही मोफत लसीकरण के ले जाणार आहे.
’पहिल्या व दुसऱ्या मात्रेसाठी हे लसीकरण होणार असून, त्यात ५० टक्के मात्रा थेट केंद्रांवर येणाऱ्यांसाठी आणि ५० टक्के मात्रा नोंदणी करून येणाऱ्यांसाठी असतील.
’ठाणे पालिका क्षेत्रातील ४५ वर्षांवरील नागरिकांना प्रत्येक मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी तर, इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना सर्वच केंद्रावर लस देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
’मुंबईप्रमाणेच ठाणे पालिका क्षेत्रातही थेट आणि ऑनलाइन नोंदणी करून येणाऱ्यांसाठी प्रत्येकी ५० टक्के लसमात्रा असतील.