भानुप्रतापपूर (छत्तीसगड)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतून मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. तेंदू पाने गोळा करणाऱ्यांना चार हजार रुपयांचा वार्षिक प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिले. कांकेर जिल्ह्यातील भानुप्रतापपूर येथे एका प्रचारसभेत ते शनिवारी बोलत होते. 

राहुल म्हणाले की, आम्ही तुमच्यासाठी एक मोठे पाऊल उचलणार आहोत, ज्याला आपण ‘केजी ते पीजी’ म्हणतो. यानुसार विद्यार्थ्यांना छत्तीसगडमधील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण मिळेल, त्यांना एक पैसाही मोजावा लागणार नाही.

आदिवासीबहुल बस्तर भागात असलेल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला आश्वासन देताना राहुल यांनी राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास तेंदू पाने गोळा करणाऱ्यांना राजीव गांधी प्रोत्साहन योजनेंतर्गत वर्षांला चार हजार प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, असे सांगितले.

हेही वाचा >>> “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी ‘हमास’च्या निमित्ताने…”; खासदार कुमार केतकर यांचं मोठं वक्तव्य

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका करताना राहुल म्हणाले की, काँग्रेस गरीब, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी काम करते. तर, भाजप काही मोजक्या अब्जाधीशांसाठी काम करतो. राज्यातील काँग्रेस सरकारने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली आहेत. गेल्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला दोन-तीन मोठी आश्वासने दिली होती. त्यात शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला दिला जाईल, कर्जमाफी दिली जाईल, वीजबिल निम्मे करू. ही तिन्ही आश्वासने आम्ही पूर्ण केली आहे. आम्ही हे आश्वासन त्यावेळी देत असताना देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे मोठमोठे नेते असा दावा करत होते की, ही आश्वासने पूर्ण केली जाणार नाहीत. मी हे आनंदाने जाहीर करतो की, भाजपने जी आश्वासने पूर्ण केली जाणार नाही असे छातीठोकपणे सांगितले होते, ती कामे आम्ही दोन तासांत पूर्ण केली आहेत. 

केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करू आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत राहिल्यास जातनिहाय सर्वेक्षण केले जाईल, असे आश्वासनही राहुल यांनी यावेळी दिले.

पहिल्या टप्प्यातील २२३ उमेदवारांपैकी ४६ कोटय़धीश

 रायपूर :  छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रिंगणातील २२३ उमेदवारांपैकी ४६ उमेदवार कोटय़धीश आहेत. यापैकी आम आदमी पक्षाचे उमेदवार खडगराज सिंह हे ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) आणि ‘छत्तीसगड इलेक्शन वॉच’च्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची सरासरी संपत्ती एक कोटी ३४ लाख रुपये आहे.  या अहवालानुसार, राज्यातील प्रमुख पक्षांपैकी २० भाजप उमेदवारांची प्रति उमेदवार सरासरी संपत्ती पाच कोटी ३३ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free education from kg to pg if congress is re elected in chhattisgarh says rahul gandhi zws