Israel Hamas War : अनेक महिन्यांपासून युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या इस्रायल व हमास यांच्यातील युद्धविराम कराराचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. ज्याचा एक भाग म्हणून ९० पॅलेस्टिनी कैदी आणि ओलिसांना इस्रायली तुरुंगातून वेस्ट बँकमध्ये सोडण्यात आले. आता, कराराचा एक भाग म्हणून हमासनेही अनेक इस्रायली ओलिसांची सुटका करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की “सरकार सर्व ओलिसांना परत करण्यासाठी वचनबद्ध आहे, त्यापैकी बहुतेकांना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझामध्ये हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यादरम्यान पकडण्यात आले होते. दरम्यान, हमासने शनिवारी (२२ फेब्रुवारी) सहा इस्रायली ओलिसांना मुक्त केलं. यापैकी ओमर शेम तोव या ओलिसाने त्याला मुक्त करतेवेळी अपहरणकर्त्या दहशतवाद्यांच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तसेच त्याने समोर उभ्या गर्दीला फ्लाइंग किस करत त्याचा आनंद साजरा केला. ओमर शेम तोव हा तब्बल ५०० दिवसांनी स्वगृही परतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, ओमरने केलेल्या कृतीमुळे जगभरात वेगवेगळी चर्चा सुरू झाली होती. समाजमाध्यमांवर हमासचं समर्थन करणाऱ्या पोस्ट पाहायला मिळू लागल्या होत्या. अशातच ओमरने त्याच्या कृतीबाबत खुलासा करत म्हटलं आहे की त्याला असं करण्यास सांगण्यात आलं होतं. ओमर म्हणाला, “मला हमासच्याच लोकांनी सोडतेवेळी त्यांच्या एक-दोन साथीदारांच्या कपाळावर चुंबन करण्यास सांगितलं होतं”. डेली एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ओमर शेम तोवच्या वडिलांकडून खुलासा

ओमर शेम तोवच्या वडिलांनी सांगितलं की “माझा मुलगा मंचावर उभा असताना अपरहणकर्त्यांनी त्याला हात हालवून आठवण करून दिली की त्याला अपहरणकर्त्याचं चुंबन घेण्यास सांगितलं आहे. अपहरणकर्त्यांनी ओमरला तसं करण्यास भाग पाडलं. तुम्ही त्या घटनेचं मीडिया फुटेज पाहू शकता. त्यामध्ये एक अपहरणकर्ता त्याच्याजवळ गेला आणि त्याला दिलेल्या आदेशाची आठवण करून दिली”. दी टाईम्स ऑफ इस्रायलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यापाठोपाठ हमासचे दहशतवादी इस्रायलच्या सीमा ओलांडून आत घुसले व त्यांनी इस्रायली नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात १,२०० हून अधिक लोक मारले गेले. तसेच हमासच्या दहशतवाद्यांनी २५० इस्रायली नागरिकांचं अपरहण केलं होतं. हे नागरिक ५०० हून अधिक दिवसांपासून हमासच्या ताब्यात होते. ७ ऑक्टोबरच्या दिवशी इस्रायलच्या नेगेव्ह वाळवंटातील नोव्हा संगीत महोत्सवातून अनेक इस्रायली नागरिकांचं अपहरण करण्यात आलं होतं. ओमर शेम तोव हा देखील त्यांच्यापैकीच एक होता.