फ्रान्सचे संशोधक ल्यूक माँटग्नियर (Luc Montagnier) यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं. त्यांना एचआयव्ही व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी २००८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. माँटग्नियर यांनी मंगळवारी पॅरिस उपनगरातील न्यूली-सुर-सीन येथे अखेरचा श्वास घेतला. फ्रान्स सरकारने याबद्दल माहिती दिली आहे.
माँटग्नियर यांनी एचआयव्ही विषाणू शोधण्यासाठी प्रचंड मेहतन घेतली होती. मात्र, नंतरच्या वर्षांत त्यांनी विज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांना आव्हान देणारे काही प्रयोग करून सहकाऱ्यांपासून स्वतःला दूर केले. करोना व्हायरस आल्यानंतर ते करोना प्रतिबंधात्मक लसींना जाहीरपणे विरोध करत होते.
दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी एका लेखी निवेदनात ल्यूक माँटग्नियर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची एड्सविरूद्ध लढाई खूप मोठी होती आणि त्यासाठी त्यांचं योगदान अमुल्य होतं, असं म्हणत मॅक्रॉन यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.
माँटग्नियर यांचा जन्म १९३१ मध्ये मध्य फ्रान्समधील चाब्रिस गावात झाला. नोबेल प्राईज वेबसाईटवर त्यांच्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार, माँटग्नियर यांनी पॉइटियर्स आणि पॅरिसमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. १९५७ मधील वैज्ञानिक शोधांनी त्यांना आण्विक जीवशास्त्राच्या वेगाने प्रगती करत असलेल्या क्षेत्रात विषाणूशास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा दिली होती, असं त्यांनी सांगितलं होतं.
ते १९६० मध्ये नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (CNRS) मध्ये रुजू झाले आणि १९७२ मध्ये पाश्चर इन्स्टिट्यूटच्या व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख बनले. “एक विषाणू एका नव्या संसर्गजन्य रोगाचे मूळ असू शकते, अशी माहिती जेव्हा प्रसारित केली गेली, तेव्हा एड्सच्या संशोधनामध्ये माझा सहभाग १९८२ मध्ये सुरू झाला,” असे माँटग्नियर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले होते.