संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅण्टनी यांनी सोमवारी राज्यसभेमध्ये आमचा संयम गृहीत धरू नका, असे पाकिस्तानला ठणकावूनही पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी पुन्हा एकदा अत्याधुनिक शस्त्रांसह पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग करण्यात आला. पूंछमधील भारतीय सीमाक्षेत्रात हमीरपूर आणि मेंधर या भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्करानेही यास चोख प्रतिउत्तर दिल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या १५ दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची ही २४ वी घटना आहे.
मंगळवारी सकाळी पाकिस्तानकडून हमीरपूर येथील भारतीय लष्करी ठाण्यांवर हल्ला चढविण्यात आला. पूंछ जिल्ह्य़ातील मेंढर येथे स्वयंचलित शस्त्रांद्वारेही हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवारी याच भागामध्ये पाकिस्तानने कुरापती काढल्या होत्या. त्या वेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक घडली होती. पूंछ जिल्ह्य़ामध्ये असलेल्या नागरी वस्त्यांनाही पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत आहे.