पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी छापा टाकण्यास गेले असताना त्यांच्यावर जमावाने केलेले हल्ला म्हणजे जनभावनेचा उद्रेक असल्याचा दावा पश्चिम बंगालचे मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी केला. या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.दरम्यान, राज्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर छापे टाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा नाटय़मय घडामोडी रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
राज्याचे कृषीमंत्री चट्टोपाध्याय म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये एका ठिकाणी जनक्षोभाचा उद्रेक आपण पाहिला. मात्र, या तपास यंत्रणा भविष्यात देशाच्या इतर भागात अशा पद्धतीने जेथे छापे टाकतील तेथेही असेच हल्ले होतील. राज्याच्या सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत ५ जानेवारी रोजी संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर शेख यांच्या शेकडो समर्थकांनी हल्ला केला होता ज्यात त्यांचे तीन अधिकारी जखमी झाले होते.
हेही वाचा >>>“महाराष्ट्रात आमच्या सर्वाधिक जागा येणार, प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी आणि मविआत…”, संजय राऊत यांची घोषणा
चट्टोपाध्याय यांनी असा दावा केला की नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) केंद्रातील सध्याच्या भाजप नेतृत्वाखालील राजवटीत झालेले कोटय़वधींचे घोटाळे उघडकीस आणले आहेत, परंतु हा भाजप केवळ बिगर भाजपशासित राज्यांत कारवाईसाठी तपास यंत्रणांना पिटाळतात.मात्र, हे आरोप फेटाळून लावत भाजपचे खासदार दिलीप घोष म्हणाले की, राज्यातील जनतेला वाचवण्यासाठी तृणमूल काँग्रेस सरकारला तात्काळ सत्तेतून हटवायला हवे. तर, अशा वक्तव्यांद्वारे चट्टोपाध्याय राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे डाव्या आघाडीचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी सांगितले.