Violence in West Bengal over Waqf Act : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात देशभर संतापाची लाट उसळत असताना आता पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्यांदा हिंसाचार घडला आहे. पश्चिम बंगालमध्ये सोमवारी दक्षिण २४ परगणा येथे वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बॅरिकेट्स तोडले, वाहने जाळली

कोलकात्याच्या रामलीला मैदानावर आयोजित रॅलीत जाण्यापासून पोलिासंनी ISF कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे हा हिंसाचार घडून आल्याचं म्हटलं जातंय. ISF नेते आणि भांगरचे आमदार नौशाद सिद्दीकी या कार्यक्रमात भाषण करणार होते. भांगर, मीनाखान आणि संदेशखली येथील अनेक निदर्शकांना बसंती महामार्गावरील भोजेरहाट येथे रोखण्यात आलं. बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न झाल्याने ताणवही निर्माण झाला. परिणामी संघर्ष वाढत गेला. अनेक पोलीस वाहने जाळण्यात आली असून पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये एका ISF समर्थकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

आंदोलकांनी काही पोलीस वाहने जाळली आणि पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या हिंसाचारामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निदर्शकांना अखेर परिसरातून हटवण्यात आले आहे.

१५० जणांना अटक, कडेकोट पोलीस बंदोबस्त

वक्फ कायद्याविरोधात मुशिर्दाबादमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. यावेळी येथे तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी १५० जणांना अटक केली असून समसेरगंज, धुलियान, सुती आणि जवळच्या भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

राज्यात अंमलबजावणी नाही – ममता

वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केली. हा कायदा आम्ही नाही तर केंद्र सरकारने केला असे त्यांनी स्पष्ट केले. समाजकंटकांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.