रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली होती. यावेळी दोन गटांनी एकमेंकावर दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांना आग लावली . संतप्त जमावाने काही खासगी वाहनांनाही आगीच्या भक्ष्यस्थानी केलं. रामनवमीच्या दिवशी घडलेली ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला आहे.

रविवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रिश्रा परिसरात भारतीय जनता पार्टीच्या ‘शोभा यात्रे’दरम्यान हिंसाचार आणि जाळपोळ झाली. यावेळी दगडफेक झाल्याचीही माहिती मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे उपाध्यक्ष दिलीप घोष हे या ‘शोभा यात्रे’चं नेतृत्व करत होते. यावेळी काही समाजकंठकांनी गोंधळ घातला. ही शोभा यात्रा भाजपा, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि इतर काही हिंदू संघटनांनी आयोजित केली होती. या हल्ल्यात आमदार विमन घोष जखमी झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच चंदननगरचे पोलीस आयुक्त अमित जबलगीर यांनी अतिरिक्त पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “आज हुगळी येथे जो प्रकार घडला आहे, तो हावडा येथे घडलेल्या हिंसाचाराप्रमाणेच आहे. भाजपा पूर्वनियोजित पद्धतीने दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.”

रामनवमी हिंसाचार

रामनवमीच्या दिवशी हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ३८ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच काही पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्या जाळण्यात आल्या होत्या.

Story img Loader