झारखंडमध्ये २० वर्षीय आदिवासी तरुणाने आपल्या २४ वर्षीय चुलत भावाची गळा कापून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने गळा कापल्यानंतर त्याच्या मित्रांनी शीर हातात घेऊन फोटो काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुरहू परिसरात ही घटना घडली.
पीडित तरुणाच्या वडिलांनी २ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीचा समावेश आहे.
तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कानू मुंडा १ डिसेंबरला घऱात एकटा होता. शेतातील कामांसाठी कुटुंबीय घऱाबाहेर गेले होते. संध्याकाळी घऱी परतल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना पुतण्या सागर मुंडा आणि त्याच्या मित्रांनी कानूचं अपहरण केल्याची माहिती दिली. कानूचा शोध लागत नसल्याने वडिलांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
कानूचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं होतं. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना जंगलात धड सापडलं. तसंच तेथून १५ किमी अंतरावर शीर फेकून देण्यात आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी शीरासह फोटो काढले होते.
पोलिसांनी पाच मोबाइल, दोन धारदार शस्त्रं, कुऱ्हाड आणि एक वाहन जप्त केलं आहे. पोलिसांच्या महितीनुसार, जमिनीच्या एका तुकड्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या अनेक काळापासून वाद सुरु होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आली आहे.