Stampede Situations in Kumbh Mela : मौनी अमावस्येनिमित्त गंगातिरी पवित्र शाही स्नान करण्याकरता जमलेल्या भाविकांमध्ये बुधवारी पहाटे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यात अनेकजण गंभीर जखमी असून अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचीही भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, महाकुंभमेळ्यात घडलेली ही पहिली घटना नाही. याआधीही कुंभमेळ्यात अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊयात.

हत्तीमुळे ५०० जणांचा मृत्यू

१९५४ मध्ये स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज (तेव्हाचा अलाहाबाद) येथे भरवण्यात आला होता. पण या पहिल्याच कुंभमेळ्याला गालबोट लागलं होतं. ३ फेब्रुवारी २९५४ रोजी मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरच पवित्र स्नानासाठी अलाहाबाद येथे भाविकांनी गर्दी केली होती. ३ फेब्रुवारी १९५४ रोजी संगम घाटावर एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ५०० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

व्हीआयपी पाहुण्यांमध्ये चेंगराचेंगरी

१९८६ मध्ये हरिद्वारमधील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन किमान २०० लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग हे विविध राज्यांतील अनेक मुख्यमंत्री आणि संसद सदस्यांसह हरिद्वारला आल्यावर हा गोंधळ उडाला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान्य लोकांना नदीकाठावर जाण्यापासून प्रतिबंधित केल्याने जमाव अस्वस्थ झाला आणि अनियंत्रित झाला, यामुळे प्राणघातक चेंगराचेंगरी झाली.

नाशिकच्या गोदावरीतही झाली होती चेंगराचेंगरी

२००३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नानासाठी हजारो यात्रेकरू गोदावरी नदीवर जमले असताना चेंगराचेंगरीत डझनभर भाविक ठार झाले. चेंगराचेंगरीत महिलांसह ३९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

रेल्वे स्थानकावर गोंधळ

२०१३ मध्ये कुंभमेळ्यादरम्यान अलाहाबाद रेल्वे स्थानकावर १० फेब्रुवारी २०२३ रोजी एक पूल कोसळल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला आणि ४५ जण जखमी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती

२०२५ – महाकुंभाच्या १२ किमी लांबीच्या नदी किनारी तयार केलेल्या संगम आणि इतर सर्व घाटांवर बुधवारी पहाटे प्रचंड गर्दी जमली होती. मौनी अमवास्येच्या शूभ मुहूर्तावर शाही स्नान करण्याकरता भाविकांनी गर्दी केली होती. परंतु, ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामध्ये अनेक भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.