Mukesh Chandrakar Death: छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येनंतर देशभरातील माध्यमांमध्ये खळबळ उडाली. रस्ते कामात झालेला भ्रष्टाचार उघड केल्यानंतर मुकेश चंद्राकर यांची हत्या करण्यात आली. ३२ वर्षीय चंद्राकर यांचे आयुष्य वळणावळणाचे आणि संघर्षमय असे होते. आदिवासी भागातील मोहाची दारू विक्रेता आणि दुचाकी मॅकेनिक म्हणून कधी काळ काम करणाऱ्या चंद्राकर यांनी पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना हात घालणाऱ्या चंद्राकर यांची त्यांच्याच नातेवाईकाने हत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश चंद्राकर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बसगुडा येथे झाला होता. बसगुडा गावात २००८ च्या मध्यात सशस्त्र नागरी दल आणि माओवाद्यांमध्ये तुंबळ हिंसाचार उडाला. या हिंसाचारानंतर मुकेश चंद्राकर यांचे कुटुंबिय विस्थापित होऊन विजापूरच्या निवारा केंद्रात आले. लहानपणीच वडिलांचे छत्र गमावल्यानंतर मुकेश आणि त्यांचा मोठा भाऊ युकेश यांना आईने मोठे केले. मात्र २०१३ साली कर्करोगामुळे त्यांचेही निधन झाले. याबाबत मुकेशच्या मित्राने सांगितले की, आईला वाचविण्यासाठी मुकेशने हरऐक प्रकारे प्रयत्न केले. पण उपचारासाठी तो केवळ ५० हजार रुपये जमवू शकला. मित्र म्हणून आम्हाला जे शक्य होईल, ती मदत आम्ही केली.

हे वाचा >> Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा

मुकेश चंद्राकर लहान असताना त्यांच्या कुटुंबाला दूध घेण्यासाठीही पैसे नव्हते, असेही त्यांच्या मित्राने सांगितले. मुकेश यांचे आईवर खूप प्रेम होते. विजापूरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे आईने मुकेशला दंतेवाडा येथे शिक्षण घेण्यास पाठविले. आपला दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मुकेश चंद्राकरने मोहाची दारू विक्री आणि दुचाकी दुरुस्तीचे काम केले. मोठा भाऊ युकेश मुक्त पत्रकारिता करत होता. त्याच्याकडे पाहूनच मुकेशलाही पत्रकारितेची आवड निर्माण झाली. त्यानंतर मुकेशनेही पत्रकार होण्याचा ध्यास घेतला. सुरुवातीला सहारा, बंसल, न्यूज१८ आणि एनडीटीव्ही यासांरख्या काही वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केले. नक्षल प्रभावित भागांमध्ये जाऊन चकमक झालेल्या ठिकाणाहून वार्तांकन करण्यात मुकेश पटाईत होते. त्यांच्या ग्राऊंड रिपोर्टमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

पत्रकारिता करत असताना मुकेश इतर पत्रकारांनाही मदत करायचे. ज्याठिकाणी पोहोचणे शक्य नाही, अशाही परिसरात मुकेश चंद्राकर आपल्या दुचाकीवरून पत्रकारांना तिथे घेऊन जायचे. एका पत्रकाराने सांगितले की, मी जेव्हा त्याच्याशी बोलायचो तेव्हा तो बातमीबद्दल चर्चा करायचा. कोणत्या बातमीवर काम करत आहात?इकडे कधी येणार आहात? असे त्याचे प्रश्न असायचे. बातमीपलीकडे जाऊन तो प्रत्येकाशी निस्वार्थी मैत्री करायचा. छत्तीसगडमधील अनेक पत्रकारांना घटनास्थळी नेण्यासाठी त्याने मदत केली होती.

हे ही वाचा >> तरुण पत्रकाराच्या हत्येने समाजमन सुन्न, काँग्रेस नेत्याचा भ्रष्टाचार उघड केल्याने…

दंतेवाडा येथील पत्रकार रंजन दास हे मुकेश चंद्राकर यांचे जवळचे मित्र होते. २०१६ पासून ते दोघे एकत्र काम करत होते. दास म्हणाले की, विजापूरमध्ये एका मातीच्या घरात मुकेश राहायचा. या घराचे भाडे महिना २,२०० रुपये होते. आमच्या दोघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्याने मला पाच वर्ष त्याच्याबरोबर घरात राहू दिले. विजापूरमधील अनेक पत्रकार भाड्याच्या घरात राहतात. आदिवासी आणि खासकरून जल, जमीन आणि जंगलाच्या प्रश्नावर तो कमालीचा संवेदनशील होता. गावकऱ्यांची आंदोलने, बोगस चकमकी, निष्पाप नागरिकांच्या हत्या, पायाभूत सुविधांची दैना, कुपोषण आणि आरोग्य व्यवस्थेच्या हलाखीबाबत बातम्या देण्याचे काम त्याने केले. त्यामुळे आदिवासींमध्ये तो चांगलाच लोकप्रिय होता. त्याला त्याच्या कामावर नितांत प्रेम होते.

मुकेशच्या वार्तांकनामुळे त्याच्यावर सरकारकडून अनेकदा दबाव आला. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यानंतर माओवाद्यांवर टीका केल्यामुळे माओवादीही त्याला धमक्या देत असत. नक्षलवादी मुकेशच्या जीवाचे बरे-वाईट करतील, अशी आम्हाला सतत भीती वाटायची. पण गुन्हेगार त्याला अशा पद्धतीने संपवतील, असे कधीही वाटले नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From liquor seller and bike mechanic to a journalist mukesh chandrakar story was one of perseverance kvg