सियाचेनमधील हिमवादळात १० जवानांचे प्राण गमावल्यानंतर सियाचेनमधून माघार घेण्याची चर्चा देशभरात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लोकसभेत बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिकदृष्ट्या भारतीय लष्कराने सियाचेनच्या भूभागाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला माहिती आहे की, आपण त्यासाठी किंमत मोजतो आहोत. मात्र, या भागात भारतीय लष्कराने आपले स्थान टिकवून ठेवणे गरजेचे आहे. येथील सैनिकांना मी सलाम करतो, असे पर्रिकर यांनी म्हटले.
आपले सैन्य सियाचेनमधून मागे हटल्यास शत्रू या प्रदेशावर ताबा मिळवेल. त्यानंतर हा भूभाग परत मिळवणे अशक्य होऊन बसेल अथवा तो परत मिळविण्यासाठी आपल्याला आणखी काही जणांच्या प्राणांचे बलिदान द्यावे लागेल. त्यामुळेच या भागातील भारतीय लष्कराची उपस्थिती महत्त्वाची आहे. मात्र, सियाचेनसारख्या खडतर प्रदेशाचे रक्षण करणाऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे पर्रिकर यांनी सांगितले.

Story img Loader