नेस्ले इंडियाच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातल्यानंतर आता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सर्व कंपन्यांच्या इन्स्टंट नूडल्सची तपासणी करण्याचे ठरवले असून पास्ता, मॅक्रोनी ही उत्पादनेही आता रडारवर आहेत.
एफएसएसएआय या संस्थेने म्हटले आहे, की ब्रँडेड पास्ता व मॅक्रोनी या उत्पादनांना लक्ष्य करण्यात येईल व त्यांची तपासणी केली जाईल. सध्या तरी मॅगीची जाहिरात करणारे माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा व अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करण्याचा विचार नाही.
इतर कंपन्यांच्या इन्स्टंट नूडल्सची तपासणी केली जाईल. आम्हाला बंधने असण्याचे काहीच कारण नाही, आम्ही आता इतर नूडल्सचे नमुने तपासायला घेतले आहेत, असे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी युधवीर सिंह मलिक यांनी सांगितले. त्यांनी कुठल्या उत्पादनांची नावे घेतली नसली, तरी आयटीसीची सनफीस्ट यिप्पी, एचयूएलचे नॉर व निस्सीन फूडचे टॉप रॅमेन, नेपाळच्या चौधरी समूहाचे वाय वाय यांची तपासणी केली जात आहे. कुठली उत्पादने तपासली हे सोमवारी सांगण्यात येणार आहे. या उत्पादनांचे नमुने घेण्यात आले आहेत. ज्या उत्पादनांनी परवानगीच घेतलेली नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मॅगीच्या नऊ उत्पादनांवर काल एफएसएसएआयने बंदी घातली असून, मॅगी खाण्यास हानिकारक असल्याचे म्हटले आहे.
मॅगीची जाहिरात करणाऱ्यांवर कारवाईबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की अमिताभ, माधुरी व प्रीती झिंटा यांना संशयचा फायदा देता येईल, त्यामुळे त्यांच्यावर तूर्त कारवाई होणार नाही पण ग्राहक कामकाज मंत्रालय त्यांच्यावर कारवाई करू शकते. त्यांना मॅगीतील घटकांची कल्पना असो व नसो त्यांना ते जाहिरात करीत असलेल्या उत्पादनाची माहिती असायला हवी. इतर एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कॉन्झ्युमर गुड्स) वर कारवाई करणार काय असे विचारले असता त्यांनी सांगितले, की तक्रारी आल्यास त्याची दखल घेतली जाईल.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री यू.के खादेर यांनी नरमाईची भूमिका घेत सांगितले, की मॅगीवर बंदीचा निर्णय पुराव्याची कागदपत्रे असल्याशिवाय घेतला जाणार नाही. इतरही नूडल कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारने म्हटले आहे, की अन्न सुरक्षा मानकांचा भंग झाल्यास नूडल उत्पादनांवर खटले भरले जातील. आरोग्यमंत्री कौल सिंग ठाकूर यांनी सांगितले, की मॅगीचे नमुने तपासण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्य़ातून सात ते आठ नमुने घेतले जात आहेत.
पश्चिम बंगाल सरकार केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन करील, असे राज्यपाल के.एन.त्रिपाठी यांनी सांगितले. येथील नमुन्यांमध्ये काही घातक पदार्थ नसू शकतील पण केंद्र सरकार जे सांगेल त्या प्रमाणे आम्ही करू. येथील नमुन्यात काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. अन्न सुरक्षा हा समांतर सूचीतील विषय आहे असे त्यांनी सांगितले होते.
ब्रिटनमध्येही मॅगीची तपासणी
लंडन : भारतानंतर आता मॅगी नूडल्सच्या नमुन्यांची तपासणी ब्रिटनमध्येही सुरू करण्यात आली आहे. अन्न मानक संस्थेने सांगितले की, केवळ खबरदारी म्हणून चाचण्या करण्यात येत असून, अद्याप नेस्लेच्या मॅगी उत्पादनाबाबत कोणी तक्रार केलेली नाही. मॅगी सुरक्षित असल्याचा दावा नेस्ले, ब्रिटन या कंपनीने केला आहे.

Story img Loader