केंद्र सरकारसोबतच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्याने पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी बुधवारी आपला बेमुदत संप मागे घेतला. मात्र, एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी सुरू असलेला लढा यापुढेही कायम राहिल, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या शैक्षणिक कामकाजात सहभागी होऊन तासांना उपस्थित राहण्याचेही विद्यार्थ्यांनी निश्चित केले आहे.
अभिनेते गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी संस्थेतील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरू केला होता. त्यानंतर साखळी उपोषणही सुरू करण्यात आले होते. विद्यार्थी आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंदोलक विद्यार्थी व केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेली चर्चाही व्यर्थ ठरली होती. विद्यार्थी व सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या व्यर्थ ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यापुढे सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीशी चर्चा करणार नसल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
आंदोलन काळात आम्ही आमचे मुद्दे सर्वसामान्यांपर्यंत नेले. यापुढे चित्रपट निर्माते, कलाकार आणि इतरांनी आमचा लढा पुढे नेला पाहिजे. आम्ही आंदोलन काळात जे मुद्दे मांडले आहेत. ते पुढे सोडविण्यासाठी आता सर्वांनीच पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलक विद्यार्थ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Story img Loader