फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदी दूरचित्रवाहिनीवरील कलाकार गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरुद्ध सुरू केलेला लढा देशाच्या राजधानीपर्यंत नेला आहे.
पुणे येथील प्रतिष्ठित एफटीआयआयच्या ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीविरुद्धचा लढा तीव्र करत दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने केली. आम्ही ५० दिवसांहून अधिक काळापासून विरोध प्रदर्शित करत आहोत. आमचे म्हणणे ऐकून घेतले जावे, हा आमचा दिल्लीला येण्यामागील उद्देश आहे. आम्ही विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना पत्र लिहून या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, तसेच ‘अक्षम’ लोकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात आणि भविष्यातील नियुक्त्यांसाठी पारदर्शक प्रक्रिया स्थापन करण्याचा सरकारला आग्रह करावा, असे आवाहन केले होते. फक्त राहुल गांधी यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला, असे आंदोलनकर्त्यांपैकी एकाने सांगितले.
सरकारने आमच्याविरुद्ध वैचारिक युद्ध छेडले आहे, परंतु एफटीआयआय कुठल्याही राजकीय दडपणाला बळी पडणार नाही. सरकारने आमच्याशी संवाद सुरू करायलाच हवा, अशी मागणी दुसऱ्या विद्यार्थ्यांने केली.
भाजपशी संलग्न असलेले आणि ‘महाभारत’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील युधिष्ठिराच्या भूमिकेमुळे प्रख्यात असलेले चौहान यांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांनी १२ जूनपासून बेमुदत संप सुरू
केला असला, तरी चौहान यांनी पदत्याग करण्यास नकार दिला
आहे.
काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या एनएसयूआयसह काही विद्यार्थी संघटनांनी या निदर्शनांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे खासदार राज बब्बर व जद (यू)चे नेते के. सी. त्यागी हेही निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. माकपचे मोहम्मद सलीम, काँग्रेसचे राजीव शुक्ला, भाकपचे डी. राजा व राकाँच्या डी. पी. त्रिपाठी यांच्यासह त्यांनी संयुक्त निवेदनही जारी केले.
या विद्यार्थ्यांचा विरोध न्याय्य असून गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे निवड प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याकडून संपाला राजकीय रंग -राठोड
पीटीआय, नवी दिल्ली- एफटीआयआयच्या आंदोलनाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीय रंग दिला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोमवारी केला. एफटीआयआयचे प्रमुख गजेंद्र चौहान यांना पदावरून दूर करण्याच्या मागणीसाठी संस्थेतील विद्यार्थी निदर्शने करीत आहेत. निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, मात्र या प्रश्नाला राजकीय रंग देण्याची सरकारची इच्छा नाही. या प्रश्नावर बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या एका गटाला संप सुरूच ठेवण्यात स्वारस्य आहे, असे राठोड म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली त्यावरून हा संप सुरुवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही राठोड म्हणाले. हा तिढा सोडविणे गरजेचे असल्यास त्यामध्ये विद्यार्थी, प्रशासन आणि सरकारचा सहभाग हवा, कोणत्याही राजकीय पक्षाचा नको, असेही राठोड यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा