एफटीआयआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करणारे आंदोलक विद्यार्थी व केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेली चर्चा व्यर्थ ठरली. विद्यार्थी व सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या व्यर्थ ठरल्या आहेत. आजची बैठकदेखील निर्णयाविना संपली. मात्र या बैठकीत गजेंद्र चौहान हा मुद्दाच नव्हता, असे स्पष्टीकरण माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले. तर विद्यार्थ्यांनी मात्र आम्ही आमची मागणी नव्याने सरकारसमोर ठेवल्याचे सांगितले.
आज झालेल्या बैठकीनंतर राठोड म्हणाले की, एफटीआयआयमध्ये पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना मुंबईच्या दूरदर्शन स्टुडिओतील अत्याधुनिक कॅमेरे उपलब्ध करून देण्यावर सरकार सकारात्मक विचार करीत आहे. पूर्वीप्रमाणे तज्ज्ञांशी चर्चा करूनच यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, आम्ही आमच्या मागण्या पुन्हा एकदा माहिती व प्रसारण विभागासमोर ठेवल्या आहेत, अशी प्रतिक्रिया एफटीआयआय आंदोलक विद्यार्थी संघटनेच्या रणजित नायर यांनी दिली. हे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यमंत्री राठोड यांना लक्ष्य घालण्यास सांगितले होते. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याने केंद्र सरकार संतप्त झाले.

Story img Loader