सरकारी तेल कंपन्यांनी आज (१७ जुलै २०२१ रोजी) सकाळी पेट्रोलचे नवीन दर जारी केले आहेत. गुरुवारी इंधनाचे दर वाढवल्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा पेट्रोलचे दर ३० पैशांनी वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले तर मुंबईमधील पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झालीय. दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. डिझेलच्या दरामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाही. डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. मुंबईमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी आता १०७.८३ रुपये मोजावे लागत आहे. याच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पार्टी इंडिया (एम) चे महासचिव सीताराम येचुरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने इंधन दरवाढीसंदर्भात श्वेतपत्रिका सादर करावी अशी मागणी येचुरी यांनी केलीय.
आज झालेल्या दरवाढीची बातमी शेअर करत येचुरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. “(ही दरवाढ) गुन्हेगारी स्वरुपाची आहे. १ जुलै ते १७ जुलैदरम्यान दहाव्यांदा दरवाढ झालीय. देशातील २० हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एका लीटरसाठी १०० हून अधिक रुपये मोजावे लागत आहे. सरकार इंधनावर उत्पादन शुल्क म्हणून कमवत असलेला सर्व पैसा कुठे जात आहे? यासंदर्भात संसदेमध्ये श्वेतपत्रिका आणा. यासंदर्भात मोदींना जाब विचारायलाच पाहिजे,” असं येचुरी म्हणाले आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये मे महिन्यापासून आतापर्यंत ४१ वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. या ४१ दिवसांमध्ये पेट्रोल १०.७९ रुपयांनी तर डिझेल ८.९९ रुपयांनी महागले आहे. जुलै महिन्यामध्येच नऊ वेळा इंधनरदवाढ झाली आहे. मे महिन्यात १६ वेळा पेट्रोलचे दर वाढलेत. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या ४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. देशामध्ये गुरुवारच्या आधी तीन दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ करण्यात आली. शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा दरवाढ करण्यात आलीय. मागील दोन महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत.
नक्की पाहा >> “या फोटोला कॅप्शन सुचवा…”; पेट्रोल पंपावरच मोदींसमोर लोटांगण घातल्याचा फोटो झाला व्हायरल
चार मोठ्या शहरांमधील पेट्रोल, डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price on 17 July 2021)
>> दिल्ली – पेट्रोल १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रतिलिटर
>> मुंबई – पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर
>> चेन्नई – पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
>> कोलकाता – पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रतिलिटर
नक्की पाहा >> Petrol Price : ‘या’ देशात १.४५ रुपये प्रतिलिटर दरात मिळतं पेट्रोल
इतर शहरांमधील भाव (Petrol-Diesel Price on 17 July 2021)
>> बेंगलुरु – पेट्रोल १०५.२५ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रतिलिटर
>> लखनऊ – पेट्रोल ९८.६९ रुपये आणि डिझेल ९०.२६ रुपये प्रतिलिटर
>> पाटणा – पेट्रोल १०४.५७ रुपये आणि डिझेल ९५.८१ रुपये प्रतिलिटर
>> भोपाळ – पेट्रोल ११०.२५ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रतिलिटर
>> जयपूर – पेट्रोल १०८.७१ रुपये आणि डिझेल ९९.०२ रुपये प्रतिलिटर
>> गुरुग्राम – पेट्रोल ९९.४६ रुपये आणि डिझेल ९०.४७ रुपये प्रतिलिटर
>> पुणे – पेट्रोल १०७.१० रुपये आणि डिझेल ९५.५४ रुपये प्रतिलिटर
>> नागपूर – पेट्रोल १०७.२० रुपये आणि डिझेल ९५.७६ रुपये प्रतिलिटर
>> नाशिक – पेट्रोल १०७.५० रुपये आणि डिझेल ९६.२३ रुपये प्रतिलिटर