एक एप्रिल हा ‘एप्रिल फूल’ बनविण्याचा दिवस.. इंटरनेटचे क्षेत्रही त्यापासून सोमवारी दूर नव्हते! ‘यू-टय़ूब’ बंद होत आहे, ट्विटरचा वापर करणाऱ्यांना आता रक्कम मोजावी लागेल, आदी संदेशांद्वारे नेटधारकांना ‘एप्रिल फूल’ करण्याचा प्रयत्न सोमवारी करण्यात आला.
‘यू-टय़ूब’ या संपूर्ण विश्वातील सर्वात मोठय़ा अशा व्हिडीओ संकेतस्थळावर एक अनोखी अशी घोषणा करण्यात आली. सवरेत्कृष्ट व्हिडीओच्या आम्ही शोधात असून सोमवारीच मध्यरात्री संबधित प्रवेशिका स्वीकारणे बंद होऊन यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचा निकाल २०२३ या वर्षी घोषित करण्यात येईल, असे ‘स्पर्धा संचालक’ म्हणवून घेणाऱ्या ‘टीम लिसन’ने सांगितले. हा अर्थातच ‘एप्रिल फूल’चाच मामला होता !
‘गूगल’वरूनही तुम्हाला एक आगळावेगळा अनुभव येईल, असे सांगण्यात येत होते. संपूर्ण जगभरातील विविध गंधांचा आपल्याकडील माहितीसाठय़ात (डेटाबेस) समावेश करण्यात आला असून तुम्ही त्याद्वारे एखाद्या नवीन कारचा किंवा अन्य एखाद्या विशिष्ट गोष्टीचा गंध अनुभवू शकाल, असे गमतीशीर आवाहन ‘गूगल’वरून करण्यात येत होते.
इंटरनेटचा वापर करणाऱ्यांना ‘ट्विटर’वरून एक वेगळे आवाहन करण्यात येत होते. ट्विटरचा उपयोग करणाऱ्यांसाठी नवीन स्वरविरहित सेवा आम्ही तुमच्यासाठी आणत असल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या उत्तर आणि दक्षिण कोरियाचा वाद पराकोटीस गेला असून त्यांच्यात केव्हाही ठिणगी उडण्याची शक्यता आहे. ‘बेवॉच’ आणि ‘नाइट रायडर’मध्ये काम करणारे अभिनेता डेव्हिड हॅसेलहॉफ यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पाचारण केले असून त्यांनी उत्तर कोरियात जाऊन मध्यस्थी करावी, अशी सूचना केल्याचे वृत्त ‘टॅगेस्चाऊ’ या जर्मन वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात आले आहे.. हेही एक ‘एप्रिल फूल’च!