वृत्तसंस्था, मॉस्को
रशियातील महत्त्वाचे विरोधी पक्षातील नेते अॅलेक्सी नवाल्नी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मॉस्कोमधील ‘आयकॉन ऑफ द मदर ऑफ गॉड़’ चर्चमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अंत्यसंस्कार करण्यात आले. चर्चमध्ये त्यांचे माता-पिता, नातेवाईक आणि काही मित्रमंडळी उपस्थित होती. तर बाहेर जमलेल्या हजारो लोकांनी त्यांच्या नावाचा जयघोष सुरू ठेवला.
नवाल्नी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण माफ करणार नाही असे चर्चबाहेरील काही जणांनी सांगितले. चर्चमध्ये नवाल्नी यांच्या मृतदेह एका शवपेटीत ठेवण्यात आला होता आणि त्यांचा मृतदेह फुलांनी झाकला होता. डोक्याला काळा स्कार्फ गुंडाळलेली आणि एका हातात मेणबत्ती घेतलेली त्यांची आई ल्युदमिला नवाल्नाया आणि त्यांचे पिता अॅनातोली नवाल्नी त्यांच्या मृतदेहाशेजारी बसले होते.
हेही वाचा >>>ऐंशीहून अधिक विद्यमान खासदारांना नारळ? भाजप केंद्रीय निवडणूक समितीची व्यूहरचना, मंत्र्यांची उमेदवारी मात्र निश्चित
चर्चच्या पाद्रींनी अंत्यविधी केले. यावेळी सामान्य लोकांना चर्चमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. काही जणांनी जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. नवाल्नी यांची शवपेटी नेली जात असताना ‘‘रशिया मुक्त होईल’’, ‘‘युद्धाला आमचा नकार आहे’’, ‘‘पुतिनशिवाय रशिया’’, ‘‘आम्ही विसरणार नाही’’ आणि ‘‘पुतिन खुनी आहेत’’ अशा घोषणा लोकांनी दिल्या. ‘‘येथे आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कोणालाही भीती वाटत नाही’’, असे एका व्यक्तीने सांगितले. तर, ‘‘मी नवाल्नी यांच्या कुटुंबीयांना पािठबा देण्यासाठी आलो आहे’’, असे अन्य एकाने सांगितले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कठोर टीकाकार असलेल्या ४७ वर्षीय अॅलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू १६ फेब्रुवारीला तुरुंगात झाला. त्यांच्या मृत्यूसाठी पुतिन हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांनी केला आहे. मात्र, पुतिन यांच्या कार्यालयाकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.