रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दोन टक्क्यांनी वाढ करून आठवडाही उलटला नसताना शुक्रवारी पुन्हा एकदा राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या गाड्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. येत्या १७ ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यामध्ये २५ ते २७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या गाड्यांच्या सर्व प्रकाराच्या श्रेणींसाठी ही दरवाढ लागू असणार आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. या रेल्वेमध्ये देण्यात येणाऱया खानपान सेवेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ही भाववाढ करण्यात आली आहे. या गाड्यांच्या प्राथमिक प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. केवळ त्यातील खानपान सेवेच्या दरात वाढ झाल्यामुळे अंतिम तिकीटामध्ये २५ ते २७ रुपयांनी होणार आहे. या गाड्यांमध्ये केटरिंगची सुविधा देणाऱयांना गेल्या १४ वर्षांपासून कोणतीही दरवाढ देण्यात आलेली नव्हती, असेही या अधिकाऱयाने स्पष्ट केले.