एक्स्प्रेस वृत्त/वृत्तसंस्था
चेन्नई : ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सव्र्हिसेस’च्या सांतियागो मार्टिनची गोष्ट ही व्यक्तीची स्वप्ने आणि राजकीय घोटाळयांची सांगड दर्शवणारी आहे. मार्टिन म्यानमारमध्ये मजूर म्हणून काम करत होता. तिथून परतल्यानंतर १९८८ मध्ये त्याने कोईम्बतूर येथे ‘मार्टिन लॉटरी एजन्सीज लि.’ स्थापन केली आणि लॉटरीचा व्यवसाय सुरू केला. लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वप्ने विकताना राजकीय लागेबांधे जोपासले आणि त्याचा वापरही करून घेत त्याने भारतातील सर्वात बडा लॉटरी व्यावसायिक होण्यापर्यंत मजल मारली.
‘लॉटरी किंग’ मार्टिन अनेक वर्षे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर होता. त्याच्या ‘फ्युचर गेम्स अँड हॉटेल सव्र्हिसेस’ने एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सर्वाधिक, म्हणजे १,३६८ कोटींचे निवडणूक रोखे विकत घेतले. तमिळनाडूत २००३ मध्ये लॉटरीवर बंदी घालण्यात आली होती, तरीही अनेकांना ‘मार्टिन लॉटरी’ हे नाव अजूनही आठवते.
हेही वाचा >>> मेघा इंजिनीअरिंग, शिर्के कन्स्ट्रक्शनच्या देणग्यांमध्ये ठरावीक ‘पॅटर्न’
मार्टिनच्या मालकीची ‘फ्युचर गेमिंग सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.’ ही ‘सिक्कीम लॉटरीज’ची मुख्य वितरक आहे. त्याने केरळमध्ये फसव्या लॉटरी विक्रीने सिक्कीम सरकारचे ९०० कोटींपेक्षा जास्त नुकसान केल्याबद्दल २००३ मध्ये ईडीने त्याची सुमारे ४५७ कोटींची मालमत्ता गोठवली होती. सिक्कीम सरकारी लॉटरीच्या केरळमधील विक्रीच्या संबंधाने सीबीआयने मार्टिन आणि इतरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई केली होती.
मार्टिनच्या उद्योगांविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाने २३ सप्टेंबर २०१९ रोजी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना पत्रे पाठवून चिंता व्यक्त केली होती. या पत्रानंतर १० दिवसांच्या आत, ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स’ने १९० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकत घेतले. पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये लॉटरीला प्रतिबंध असतानाही मार्टिन ‘बेकायदेशीरपणे’ लॉटरी विकत होता. त्याने केरळमध्येही अनेक बेकायदा प्रकार केले होते, ज्याची माहिती राज्याने दिल्यानंतर गृह मंत्रालयाने केरळमधील लॉटरीवर बंदी घातली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या पत्रानंतर कंपनीने ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडणूक रोखे खरेदी करायला सुरुवात केली. त्या एका महिन्यात या कंपनीने १९० कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या याआधीच्या वृत्तानुसार, ‘ईडी’ने कंपनी विरुद्ध २०१९ च्या सुरुवातीला आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली होती. त्या वर्षी जुलैपर्यंत, कंपनीच्या मालकीची २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली होती. २ एप्रिल २०२२ रोजी ‘ईडी’ने त्यांची ४०९.९२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली. त्यानंतर पाचच दिवसांनी ‘फ्युचर गेमिंग’ने १०० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले.