नवी दिल्ली : देशात विविध परीक्षांचे पेपर फुटत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपर फुटीचा हा प्रकार जाणिवपूर्वक केला जात असल्याचा आरोप केला आहे. सहा राज्यात पेपर फुटीचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

देशभरात परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. हे पद्धतशीर षडयंत्र आहे. पेपरफुटी हा तरुणांसाठी पद्माव्यूह बनला आहे, असे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी या संकटाची तुलना महाभारतातील एक गुंतागुंतीचा लष्करी सापळा असलेल्या पौराणिक ‘पद्माव्यूह’शी केली आहे. या सापळ्यात विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास भोगावे लागत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले तर जात आहेच, शिवाय गुणवत्तेपेक्षा बेईमानी अधिक फायदेशीर वाटावी, असे वातावरणही निर्माण होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.