इंडोनेशियातील बाली येथील ‘जी-२०’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. अमेरिका, फ्रांन्स यासारख्या देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान यांनीदेखील या परिषदेस हजेरी लावली आहे. दरम्यान, परिषदेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला मोठे आश्वासन दिले आहे. भारत देश २०३० सालापर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही अक्षय उर्जास्त्रोतांपासून करेल, असे मोदी म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> G20 Summit: कंबोडियाचे पंतप्रधान रात्री पोहोचले आणि सकाळी करोना पॉझिटिव्ह, त्यांनी भेट घेतलेले बायडन मोदींसह सर्वांच्या भेटीला
“भारत देश आगामी २०३० सालापर्यंत ५० टक्के उर्जा ही अक्षय उर्जास्त्रोपांपासून निर्माण करेल. त्यासाठी विकसनशील देशांना शास्वत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, किफायतशीर वित्तपुरवठा आदी बाबी गरजेच्या आहेत,” असे मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाच्या संदर्भानेदेखील भाष्य केले आहे. जगाला युद्धबंदी आणि मुत्सद्देगीरीचा मार्ग पुन्हा एकदा शोधावा लागेल. असे मोदी म्हणाले आहेत. “याआधी दुसऱ्या महायुद्धामुळे जगात हाहा:कार माजला होता. या महायुद्धानंतर तत्कालीन नेत्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. आता आपण हा मार्ग स्वीकारण्याची वेळ आहे. शांतता सुनिश्चित करण्यासाठी निश्चय करण्याची गरज आहे. आगामी वर्षात बुद्ध आणि गांधीजींच्या पवित्र भूमित जी-२० परिषद होणार आहे. या परिषदेत आपण सर्वजण जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी सहतम असू, असा मला विश्वास आहे,” असे मोदी म्हणाले.