G D Bakshi on Pakistan & China : “भारताला घाबरून पाकिस्तान रडत-रडत त्यांच्या आकाकडे म्हणजेच चीनकडे गेला आहे. मेरे आका मुझे बचाओ, अशी विनवणी करू लागला आहे”, असं वक्तव्य निवृत्त मेजर जनरल (भारतीय लष्कर) गगनदीप बक्षी यांनी केलं आहे. “पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे, म्हणून अणुबॉम्ब टाकण्याची पोकळ धमकी देतोय. मात्र, पाकिस्तानला अणुबॉम्ब वापरता येणार नाही”, असंही बक्षी यांनी म्हटलं आहे.
जी. डी. बक्षी म्हणाले, “भारताने २०१९ मध्ये बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. तेव्हा पाकिस्तान रडत चीनकडे गेला होता. आता पुन्हा एकदा रडू लागला आहे. रडत चीनकडे गेला आहे. २०१९ मध्ये पाकिस्तान रडत गेला तेव्हा चीनने लडाखमध्ये लष्करी प्रात्यक्षिकं केली होती. करोना काळातही चीनने अशीच आगळीक केली होती. त्यांनी जगभर करोना पसरवला आणि त्यानंतर त्यांना वाटलं की आता जगभरातील सगळे देश कमकुवत झाले आहेत. याचाच आपण फायदा घेऊया. आपण आक्रमणही करू शकतो, असं त्यांना वाटत होतं. परंतु, गलवान खोऱ्यात त्यांना चांगलाच मार पडला. आत्ताही भारताकडे अशी संधी आहे.”
भारताने चोहोबाजूंनी पाकिस्तानवर हल्ला करावा, जी. डी. बक्षींचा सल्ला
माजी मेजर जनरल जी. डी. बक्षी म्हणाले, “बगराम एअर बेसवर आपल्या सैन्य तुकड्या उतरवून आपल्याला हल्ला करता येईल. आपण पलिकडे (पाकिस्तानच्या पलिकडे अफगाणिस्तान) तालिबानशी बोलायला हवं. तिकडून पाकिस्तानवर हल्ला करावा. समुद्रमार्गे नौदलाने हल्ला करावा. जमिनीवरून कारवाई तर चालू आहेच. चोहोबाजूंनी पाकिस्तानवर हल्ला करावा. असं केल्यास पाकिस्तानचे धाबे दणाणतील. मला वाटतं पाकिस्तानवर कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे.”
अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देणं सोप्पं आहे, मात्र कृती करणं अवघड : बक्षी
पाकिस्तानने भारताला अणूबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. या धमकीबाबत बक्षी यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पाकिस्तानने आजवर अणूबॉम्ब टाकण्याची धमकी कधी दिली नाही? ते नेहमी अणूबॉम्बच्याच गोष्टी करतात. यात नवीन काहीच नाही. त्यांना वाटतं की ते अणुबॉम्बची धमकी देतील आणि आम्ही घाबरून जाऊ. या फालतू गोष्टी आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन महिने कारगिल युद्ध चाललं, तेव्हा दिल्लीवर, भारतावर किती अणुबॉम्ब पडले? साडेतीन वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. अणुबॉम्बच्या बाबतीत सर्वात शक्तीशाली असलेल्या रशियाने आतापर्यंत युक्रेनवर किंवा युरोपातील एखाद्या राष्ट्रावर किती अणुबॉम्ब टाकले? त्यामुळे पाकिस्तानने अशा पोकळ धमक्या देणं सोडून द्यावं. या अशा धमक्या देणं सोपं आहे, प्रत्यक्षात कृती करणं अवघड आहे.