भारताचा जी सॅट १५ हा संदेशवहन उपग्रह एरियन ५ प्रक्षेपकाच्या मदतीने बुधवारी पहाटे फ्रेंच गयानातील कावरू येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आला. पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी हा उपग्रह सोडण्यात आला. अतिशय अचूक असे हे उड्डाण होते. दिशादर्शन व आपत्कालीन सेवेसाठी त्याचा उपयोग होणार आहे. भूसापेक्ष कक्षेत तो सोडण्यात आला असून, त्याच्याबरोबर अरबसॅट म्हणजे बद्र ७ हा उपग्रह सोडण्यात आला. जीसॅट १५ उपग्रहाचे वजन ३१६४ किलो असून तो इन्सॅट व जीसॅट प्रणालीतील उपग्रह आहे. त्याच्यावर २४ केयू बँड ट्रान्सपाँडर गगन (जिओऑगमेंटेंड नेव्हीगेशन) पेलोडही आहे, ही जीपीएससारखी दिशादर्शन यंत्रणा आहे. जीसॅट प्रणालीतील हा तिसरा उपग्रह आहे. याआधी जीसॅट ८ व जीसॅट १० हे उपग्रह पाठवण्यात आले आहेत. इस्रोचा १९वा उपग्रह एरियनस्पेस अग्निबाणाने सोडण्यात आला. इस्रो उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुराई यांनी सांगितले, की जीसॅट १५ हा उपग्रहाने पाठवलेले संदेश कर्नाटकातील हासन येथील मुख्य नियंत्रण कक्षात प्राप्त झाले आहेत. उपग्रहाची स्थिती चांगली आहे. पुढील वर्षी जीसॅट १७ व जीसॅट १८ हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. त्यांची बांधणी पूर्ण होत आली आहे. आज जीसॅट १५ उपग्रहाचे उड्डाण दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष के. किरणकुमार यांनी सांगितले, की जीसॅट १५ हा उपग्रह म्हणजे उपग्रह दिशानिर्देशन यंत्रणेतील एक पुढचे पाऊल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा