पीटीआय, बीजिंग/ नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या सदस्य देशांत एकजूट असण्याच्या गरजेवर भर देत आर्थिक क्षेत्रातील जागतिकीकरणासाठी परस्पर सहकार्य, सर्वसमावेशकता आणि दृढ पाठिंबा देण्याचे आवाहन चीनचे पंतप्रधान लि चिआंग यांनी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेत केले. चीनच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते लि चिआंग हे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याऐवजी या परिषदेत सहभागी झाले आहेत. ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान चिआंग म्हणाले, की जागतिक सकल उत्पन्नात या गटाच्या सदस्य देशांचे एकूण योगदान सुमारे ८५ टक्के आहे. जागतिक व्यापारात या गटाच्या सदस्य देशांचे ७५ टक्क्यांहून अधिक योगदान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गटाच्या देशांची एकूण लोकसंख्या जागतिक लोकसख्येच्या दोन तृतीयांश आहे. अशा या प्रभावशाली राष्ट्रगटाला विभाजनाऐवजी एकता, संघर्षांऐवजी सहकार्य आणि बहिष्काराऐवजी सर्वसमावेशकतेची गरज आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान चिआंग यांनी ‘जी-२०’च्या सदस्य राष्ट्रांना आर्थिक जागतिकीकरणाला प्रोत्साहन खंबीरपणे पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तसेच औद्योगिक आणि पुरवठा साखळीची सर्वानी मिळून अखंडता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहनही केले. ‘जी-२०’च्या सदस्यांनी एकजूट आणि सहकार्याचे मूल्य दृढपणे पाळावे, असे ते  म्हणाले.

हेही वाचा >>> G20 Summit 2023: महासत्तांमध्ये मतैक्य; युक्रेन मुद्दय़ासह दिल्ली जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब, भारताचे राजनैतिक यश

सर्वसमावेशक आर्थिक धोरणांत सहकार्याद्वारे जागतिक आर्थिक विकासास पुन्हा चालना देण्यासाठी भागीदार म्हणून काम केले पाहिजे.  जी-२० सदस्य राष्ट्रांनी पर्यावरणपूरक विकास आणि अल्प कार्बनोत्सर्जन करणाऱ्या विकास प्रक्रियेस चालना देण्यासाठी, सागरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि जागतिक शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी परस्परपूरक भागीदार होण्यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे. – लि चिआंग, चीनचे पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 summit 2023 china calls for cooperation on economic globalization ysh